नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या शांतता रॅलीला सुरूवात
By संजय पाठक | Updated: August 13, 2024 15:21 IST2024-08-13T15:21:12+5:302024-08-13T15:21:45+5:30
हातात भगवे ध्वज घेऊन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे फलक घेऊन मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या शांतता रॅलीला सुरूवात
नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तसेच अन्य मागण्यासाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये शांतता रॅलीला सुरूवात झाली. जरांगे पाटील हे अहमदनगर येथून आज दुपारी नाशिकला पोहोचले, त्यांचे ठिकठिकाणी प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंचवटीतील तपोवन इथल्या मैदानावर जरांगे यांच्या जयजयकाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शांतता रॅलीला प्रारंभ झाला.
हातात भगवे ध्वज घेऊन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे फलक घेऊन मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यानंतर ही रॅली पंचवटी कारंजा येथून शहरातील विविध मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील जागेत या रॅलीचा समारोप हेाणार असून यावेळी जरांगे पाटील हे समाजाला संबोधीत करणार आहेत.
दरम्यान, रॅलीच्या दरम्यान माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देणारच असे सांगतानाच २८८ जागा समाजाचे उमेदवार लढवतील असे सांगितले. ओबींसीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली.