गर्भवतीच्या मदतीला धावले गस्तीपथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:37 IST2021-01-05T00:36:16+5:302021-01-05T00:37:40+5:30
नाशिक : वेळ - पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृद्ध दाम्पत्य गर्भवती महिलेला धरून पायी चालत असल्याचे नजरेस ...

गर्भवतीच्या मदतीला धावले गस्तीपथक
नाशिक : वेळ - पहाटे ३ वाजेची... ठिकाण, गंगापूर गाव...एक वृद्ध दाम्पत्य गर्भवती महिलेला धरून पायी चालत असल्याचे नजरेस पडते... पोलिसांच्या वाहनाचा दिवा चमकलेला बघताच ते थबकतात... रात्र गस्तीचे पोलीस वाहन थांबते अन् कर्मचारी खाली उतरतात... बघतात तर गर्भवती स्त्रीला प्रसूती कळा सुरू झाल्या आहेत. तत्काळ ते वाहनातून बिनतारी संदेश नियंत्रण कक्षाला देतात आणि परवानगी घेत त्वरित त्या वृद्ध दाम्पत्यासह गर्भवती महिलेला गिरणारे ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवतात.
सोमवारी पहाटेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याचे पीटर मोबाइल नेहमीप्रमाणे रात्रगस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास एक वृद्ध दाम्पत्य एका गर्भवती महिलेसोबत पायी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्राद्वारे माहिती दिली, तसेच अतिरिक्त मदत म्हणून गुन्हे शोध पथकाच्या वाहनालाही पाचारण केले.
पोलीस नाइक गिरीश महाले, राहुल सोळसे यांच्या मदतीने त्वरित गुन्हे शोध पथकाच्या वाहनात भारती जाधव (२३) आणि त्यांचे सासू-सासरे यांना वाहनचालक दत्तात्रय उगले यांनी गिरणारे रुग्णालयात अगदी कमी वेळेत दाखल केले. पहाटेची वेळ असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे वाहन गंगापूर गावापासून उपलब्ध होत नसल्याने, ते वृद्ध सासू-सासरे हे आपल्या सुनेला पायीच घेऊन रस्त्यावर आले होते आणि योगायोग असा की, रात्रीच्या गस्तिपथकाचे याकडे लक्ष वेधले गेले.
एखाद्या देवदूताप्रमाणेच त्यांनी या महिलेच्या मदतीला धावून जात मानवी संवेदना पोलीस दलात जागृत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. रात्रीच्या सुमारास पोलीस यंत्रणेकडून दाखविण्यात आलेले मदतकार्य हा कर्तव्याचा भाग असला तरी ऐनवेळी यंत्रणा कामाला लागल्याने माता आणि बालक सुखरुप असल्याचे समाधान पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले. या कामी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचा गौरवदेखील केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी सांगितले. गोंडस कन्येला दिला जन्म
गिरणारे ग्रामीण रुग्णालयात जाधव यांची यशस्वीरीत्या प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. त्यांच्या सासू-सासऱ्यांनी पोलिसांना वेळीच मदत केल्यामुळे धन्यवाद दिले. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देणार असल्याचे सांगितले.