Part time librarian service available for pension | पेन्शनसाठी अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा ग्राह्य

पेन्शनसाठी अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा ग्राह्य

ठळक मुद्देअपेक्षा उंचावल्या : उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

नाशिक : पेन्शनसाठी १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्ती असलेल्या याचिकाकर्त्यांची पूर्वीची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून
केलेली सेवा ग्राह्य धरीत संबंधित याचिकाकर्त्यास आठ आठवड्यांच्या आत पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला दिले आहेत. त्यामुळे अर्धवेळ ग्रंथपालांच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांची अर्धवेळ सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाण्याचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला असून, ग्रंथालय शिक्षक परिषदेने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नाशिकमधील प्रेमा हेरकल यांनी १९९१ ते २००५ या काळात अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून सेवा केल्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये रिक्त पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर त्यांंना नियुक्ती मिळाली. त्यानंर २०१५ मध्ये सेवारत राहिल्यानंतर त्या निवृत्त झाल्या. परंतु, पूर्णवेळ झाल्यानंतरही त्यांचे नवीन पेन्शन योजनेचे खाते उघडलेले नव्हते. अशा स्थितीत सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तिवेतनाचा प्रस्ताव शाळेने जिल्हा परिषदेमार्फत लेखा महासंचालक मुंबई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला असता संबंधित कार्यालयाने १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ नियुक्ती असल्यामुळे सेवानिवृत्तिवेतनाचा लाभ नाकारून प्रस्ताव परत पाठवला. त्यामुळे हेरकल यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सेवानिवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्यासाठी अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून केलेली सेवा ग्राह्य धरून पेन्शनचा लाभ मिळावा, अशी मागणी करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात बुधवारी (दि.११) मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत हेरकल यांची याचिका मान्य करून अर्धवेळ ग्रंथपाल पदावरची सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरून त्यांना आठ आठवड्यांच्या आत पेन्शनचा लाभ देणेबाबतचे आदेश शासनाला दिले आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर कोणताही लाभ न मिळालेल्या हेरकल यांना सेवानिवृत्तिवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अर्धवेळची सेवा ग्राह्य धरून पेन्शनचा लाभ मिळाल्याबद्दल ग्रंथालय शिक्षक परिषदेने न्यायाल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी नागपूर खंडपीठाने रागिणी गायकवाड यांनाही अशाच प्रकारचा लाभ दिलेला असून, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्चना शेलार व आसावरी चव्हाण या ग्रंथपालांची अर्धवेळ सेवाही पेन्शनसाठी ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती ग्रंथालय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विलास सोनार यांनी दिली आहे. या निर्णयामुळे अर्धवेळ गं्रथपालांच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांची सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाण्याचा विश्वास अर्धवेळ ग्रंथपालांमध्ये निर्माण झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली आहे.

Web Title: Part time librarian service available for pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.