भगूर शिवारात असलेल्या मात्र देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीत मोडणाऱ्या विजयनगर भागातून नानेगावकडे जाणारा पारंपरिक रस्ता लष्करी आस्थापनाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याचा घाट घातल्याने विजयनगर, भगूर येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना जाण्या-येण्याचा रस्ता बंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते बबनराव घोलप जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत मार्ग काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना रस्त्याचा वापर व सद्यस्थिती याबाबतचा अहवाल तातडीने देण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार काल भगूर मंडळ अधिकारी बाळासाहेब काळे, तलाठी रुबीना तांबोळी, खटावकर आदींच्या पथकाने भगूर ते नानेगाव या रस्त्याची पाहणी केली. यावेळी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांच्यासह ग्रामस्थांनी पूर्वीचा गाव नकाशा, रस्त्याचा होणारा वापर, छावणी परिषदेने मंजूर केलेले घरबांधणीचे आराखडे, शेतीचा वापर तसेच विजय नगर येथील अमितराज, अर्क, राजमाता सोसाईटी, दत्तनगरसह परिसरातील शेतकऱ्यांचा नियमित वापराचा रस्ता असल्याचे स्पष्ट केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी गाव नकाशाप्रमाणे पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना व त्यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी अशोक आडके, ज्ञानेश्वर शिंदे, प्रमोद आडके, ज्ञानेश्वर काळे, मनोहर शेळके, भूषण गायकवाड, सुधीर भोर, निवृत्ती मुठाळ सुनील मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
भगूर-नानेगाव रस्त्याचा यंत्रणेकडून ‘पंचनामा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST