जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:02 IST2020-12-18T19:37:52+5:302020-12-19T01:02:31+5:30
गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वाहनाच्या क्षमतेहून अधिक ऊस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रानमळा परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डबल ट्रॉली लावून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक पुन्हा ऐरणीवर
निफाड- पिंपळगाव रस्त्यावर मागील दोन, तीन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. यात काहींना जीव गमवावा लागला तर काही अपंग झाले आहेत. तरीही रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले. त्यात ३ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ३ जण अजूनही त्रास सहन करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षाच्या चिमुरडीला आपले पाय व वडील गमवावे लागले. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या अपघातांची नोंददेखील घेत नसल्याने सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे
कारखाना प्रशासनाचे दुर्लक्षच....
वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात नाही. कारखाना प्रशासनाचा वचक ट्रॅक्टरचालकांवर नसल्याने बेफिकीर बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. तरीही कारखाना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आले आहे.
सुरक्षासप्ताह केवळ दिखाऊ
उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो; मात्र आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही. असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
अवजड वाहतुकीचे निकष
छोटे टेम्पो - १ ते ३ टन
मोठे टेम्पो - ३ ते ९ टन
६ चाकी ट्रक - १० टन
ट्रॅक्टर -१४ ते १५ टन
१० चाकी ट्रक - १७ टन
१२ चाकी ट्रक - २२ टन
१४ चाकी ट्रक - २७ टन
ओव्हरलोडिंग रोखण्याची कोणतीच यंत्रणा आरटीओकडे नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा गंभीर प्रश्न आहे, तर तपासणी करण्यासाठीदेखील पुरेशी पथके नाहीत. जी पथके आहेत, त्या पथकांच्या कारवाया कागदोपत्रीच असतात. चिरीमिरीमुळे ठोस कारवाया होत नसल्याने ओव्हरलोडिंग राजरोस सुरूच आहे.
- उद्धवराजे शिंदे, पिंपळगाव बसवंत
अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात. दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची आणि इतरही वाहतूक करणे बेकायदेशीर आहे; मात्र सर्रास ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही, हा प्रश्नच आहे.
- प्रशांत मोरे, रानमळा, पिंपळगाव.