नाशिक : खासगी शाळांकडून होणारी मनमानी फी वसुली बंद करावी , दिल्ली सरकारप्रमाणे सरकारी शाळांच्या साेयी सुविधा , गुणवत्ता वाढवावी आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालक आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. खासगी शाळांच्या फी वसुलीबाबत आप पार्टी बरोबरच विविध संघटना आणि पालकांच्या वतीने शिक्षणमंत्र्यांना निवेदने देण्यात आली. या निवेदनावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने कुठली कारवाई झाली याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. यामुळे खासगी शाळांची मनमानी फी वसुली सुरुच आहे. कोरोना काळातील ५० टक्के फी कपातीबाबत पालकांनी निवेदन देऊनही त्याबाबतीत निर्णय झालेला नाही. सरकारी शाळांमधील गुणवत्ता ढासळत चालली आहे. परंतु याबाबत प्रयत्न कमी पडत आहेत असे निवेदनात म्हटले आहे. खासगी शाळांचे मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण करुन बेकायदेशीर वसूल केलेली फी पालकांना परत करावी. मनमानी करणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर ॲड. प्रभाकर वायचळे, अनिल कौशिक, नितीन भागवत, शिलेंद्र सिंह, ॲड. पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खासगी शाळांच्या फी विरोधात आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 01:38 IST