या.ना. जाधवांनी दिली इंग्रजांशी टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:24+5:302021-08-15T04:16:24+5:30
संगमेश्वर : १४ ऑगस्ट १९४२ मालेगाव शहराच्या पाच कंदील भागात इंग्रजांविरोधात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे मुख्य ...

या.ना. जाधवांनी दिली इंग्रजांशी टक्कर
संगमेश्वर : १४ ऑगस्ट १९४२ मालेगाव शहराच्या पाच कंदील भागात इंग्रजांविरोधात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे मुख्य वक्ते होते भाऊसाहेब हिरे. मोठा जमाव जमला होता. वातावरण अतिशय तप्त होते. सभेवर इंग्रज पोलीस गोळीबार करणार आहेत त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असते. हे ओळखून पाच कंदील, टिळक रोड भागातील गुजराथी व्यापारी बांधवांनी भाऊसाहेब हिरेंना सभेस जाण्यापासून रोखून जवळच्या घरात ठेवले. मात्र सभा सुरू झाली होती. सभेस या. ना. जाधव (वकील) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. इंग्रजांविरोधात जहाल टीका ते आपल्या ओघवत्या भाषणातून करीत होते. सभेस आलेले शहरवासीयही इंग्रजांविरोधात पेटून उठले होते. सभेत इंग्रज पोलिसांनी ठरल्याप्रमाणे गोळीबार केला. यातून या. ना. जाधव इंग्रजांच्या गोळ्या चुकवून पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र नारायण वाणी यांच्या पायाला व आपल्या ओट्यावर बसलेले जंगम यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यात ते कायमचे जायबंदी झाले. सभेतून पळून या. ना. जाधव थेट संगमेश्वरातील महादेव मंदिरासमोर राहणारे त्यांचे भाऊ व तत्कालीन नगरसेवक हरिभाऊ रामचंद्र वडगे यांच्या घरात लपून बसले. मात्र इंग्रज पोलीस त्यांना ठार मारण्याच्या इराद्याने वडगेंच्या घरी पोहोचले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच या. ना. जाधव वडगे यांच्या घरातील मागच्या दाराने कोंबडगल्ली मार्गे आग्रा रोड ते थेट मजल दरमजल करीत निमगाव येथे आसरा घेतला. वडगेंच्या घरातून त्यांना लपत छपत जात रोज जेवणाचे डबे पोहोचविले जात. पोलिसांनी छडा लावून या. ना. जाधव यांना १७ ऑगस्ट १९४२ रोजी अटक केली आणि दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या. ना. जाधव १९५७ मध्ये खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनंती करून आपल्या समवेत जायबंदी झालेले जंगम यांना दुसरा डोळा बसवून दिला, तर नारायण वाणी यांना कृत्रिम पाय बसवून दिला.
120821\072612nsk_6_12082021_13.jpg
या. ना. जाधव