Opposed to the planned vertical bitter dam | नियोजित ऊर्ध्व कडवा धरणास विरोध

नियोजित ऊर्ध्व कडवा धरणास विरोध

ठळक मुद्देखंबाळे : शेतकऱ्यांनी सभा बंद पाडली

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नियोजित उर्ध्व कडवा धरणाबाबत खंबाळे येथे बोलविलेल्या अधिका-यांच्या बैठकीस बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत सभा बंद पाडली.

दोन दशकापासून या नियोजित अप्पर कडवा धरणास शेतक-यांचा विरोध आहे. नव्वदच्या अगोदर कवडदरा येथील कडवा धरणामुळे सर्वतिर्थ टाकेदपर्यंत पाणीसाठा येणार असल्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत परीसरातील सर्व शेतक-यांची सभा होऊन सदर धरणाची उंची कमी करण्यात आली होती. नुकतेच पुन्हा घोडेवाडी येथील शेतक-यांच्या जमिनीबाबत नोटिस प्रसिध्द झाल्याने पुन्हा शेतकरी संघटीत होऊन या धरणास विरोध करत आहेत.

 टाकेद खुर्द, टाकेद बुद्रुक, घोडेवाडी, अधरवड, घोरपडेवाडी, खेड, बारशिंगवे या ठिकाणचे बाधित शेतकरी वारंवार शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना प्रत्यक्ष मंत्रालयात भेटून निवेदन देण्यात आले आहे.
शासनाचे सर्वच प्रकल्प ईगतपुरी तालुक्यात होत असून येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. तालुक्याच्या प्रत्येक कोप-यात धरणं आहेत. रेल्वे, मिलीटरी, महामार्ग, समृद्धी महामार्ग व धरणासाठी कायमच भूसंपादन प्रक्रिया चालू असते. आताही धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.

हे धरण रद्द करण्याची मागणी बारशिंगवेचे उपसरपंच पोपट लहामगे, रघुनाथ सुरडे, बाळु गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, पांडे, भालेराव, शंकर चोथवे, मदन गोरे, मच्छिंद्र लहामगे, श्रीराम मुतडक, प्रविण लहामगे, विलास लहामगे, तुकाराम लहामगे, आधरवडचे सरपंच ज्ञानेश्वर डमाळे, ज्ञानेश्वर जाधव, माजी सरपंच अशोक वाजे यांनी तहसिलदार यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.

Web Title: Opposed to the planned vertical bitter dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.