दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांना पुन्हा संधी ; १८ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक, तर २० पासून लेखीपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:00 IST2020-10-26T18:58:50+5:302020-10-26T19:00:43+5:30
शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता दहावी-बारावीच्या पुरवणी लेखीपरीक्षा २० नोव्हेंबर २०२०ला सुरू होणार आहे.

दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांना पुन्हा संधी ; १८ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक, तर २० पासून लेखीपरीक्षा
नाशिक : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होणार असून १८ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक, तर २० नोव्हेंबरपासून लेखीपरीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता दहावी-बारावीच्या पुरवणी लेखीपरीक्षा २० नोव्हेंबर २०२०ला सुरू होणार आहे. यात दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर २०२० ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत घेतल्या जातील. इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडीपरीक्षा १८ नोव्हेंबर २०२० ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०२० व फेब्रुवारी-मार्च २०२१ अशा लगतच्या दोनच संधी मिळणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्जासाठी २९ ऑक्टोबरची मुदत
पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २९ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह, तर २ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. माध्यमिक-उच्च शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे, तर ५ नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत.