ऑक्सिजनसाठी तीन स्वतंत्र मदत कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 01:04 IST2021-04-29T23:39:54+5:302021-04-30T01:04:41+5:30
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

ऑक्सिजनसाठी तीन स्वतंत्र मदत कक्ष कार्यान्वित
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
नाशिक मनपा हद्दीतील संपूर्ण व्यवस्थेचे संनियंत्रण महानगरपालिकेकडून केले जाणार असून, त्यासाठी नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त तर ग्रामीण भागाचे संनियंत्रण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून डॉ. जेजुरकर यांच्याकडून केले जाणार आहे. मालेगाव महापालिका व लगतच्या परिसराचे संनियंत्रण मालेगावचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडून केले जाणार आहे. प्रत्येक पुरवठादाराकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून दर तीन तासांनी या तीन ही मदत व माहिती वाहिन्यांना उपलब्ध केली जाईल. त्या-त्या हद्दीतील रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यासाठी मदत कक्षास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
सद्य:स्थितीत नाशिक जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील पुरवठादाराकडे ज्याप्रमाणे टँकर प्राप्त होतील, तसे रुग्णालयांनी त्या-त्या पुरवठादारांशी संपर्क करून योग्य प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध आहे, त्याची माहिती रुग्णालयांना सुलभरीत्या व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
रुग्णालयांसाठी मदत क्रमांक
नाशिक, मालेगाव महानगरपालिकांसह ग्रामीण भागाच्या मदत व माहिती कक्षांसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी ०२५३ -२२२०८००, मालेगाव महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी ८९५६४४३०६८ आणि ८९५६४४३०७०, तर नाशिक ग्रामीण हद्दीतील रुग्णालयांसाठी ९४०५८६९९४० हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.