कांदा दरात दोन दिवसात सात हजारांची घसरण, शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:01 IST2019-12-10T13:01:34+5:302019-12-10T13:01:45+5:30
उमराणे : मागील आठवड्यात बाजारभावाचा उच्चांक गाठणाऱ्या लाल व उन्हाळी कांद्याच्या दरात दोन दिवसात मंगळवार (दि. १०) रोजी येथील बाजार समितीत तब्बल सात हजारांची घसरण झाली आहे.

कांदा दरात दोन दिवसात सात हजारांची घसरण, शेतकरी संतप्त
उमराणे : मागील आठवड्यात बाजारभावाचा उच्चांक गाठणाऱ्या लाल व उन्हाळी कांद्याच्या दरात दोन दिवसात मंगळवार (दि. १०) रोजी येथील बाजार समितीत तब्बल सात हजारांची घसरण झाली आहे. शुक्र वारी (दि.६) रोजी येथील उन्हाळी कांद्याचे १३ हजार ८०० रूपये तर लाल कांद्याचे दर १२ हजार रु पये क्विंटल पर्यंत पोहचले होते. हे बाजारभाव काही दिवस तेजीतच राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच मागील आठवड्यात झालेल्या लाल कांदा आवकेच्या तुलनेत या आठवड्यात वाढ झाल्याने बाजारभावात लाल व उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या दरात तब्बल सात हजार रूपयांपर्यंत घसरण झाली. लाल कांद्यांचे दर कमीतकमी २ हजार ५०० रु पये, जास्तीत जास्त ५ हजार ५०० रु पये, तर सरासरी चार हजार रु पये असे होते. तसेच उन्हाळी कांद्यांचे दर कमीतकमी ३ हजार १०० रु पये, जास्तीत जास्त ९ हजार रु पये, तर सरासरी ६ हजार ५०० रु पयांपर्यंत होते. बाजार आवारात लाल कांद्यांचे एकुण १५८८ वाहने लिलावासाठी दाखल झाले होते.त्यापैकी २४० वाहनांचा लिलाव वेळेअभावी झाला नाही. दरम्यान कांद्यांची आवक वाढली असली तरी दोन दिवसात तब्बल सात हजारांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.