कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती
By संजय पाठक | Updated: August 21, 2023 16:15 IST2023-08-21T16:14:00+5:302023-08-21T16:15:10+5:30
केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती
नाशिक: केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. ही संपाची कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार- केंद्राशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
कांदा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाठीमागे कांद्याचे दर 300 ते 400 पर्यंत खाली आले होते. त्यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आताही नागरिकांना देखील कांदा मुबलक उपलब्ध होईल, आणि शेतकऱ्यांना देखील दोन पैसे मिळतील. असा तोडगा काढला जाईल. लवकरच चर्चा करून मार्ग काढू, तसेच सर्व व्यवहार सुरळीत होतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे भुसे यांनी सांगितले. कांद्याचे दर पडल्यावर दर वाढण्यासाठी नाफेडने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आताची कोंडी सोडविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेवू. शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही शेतकऱ्यांच्या घामाला देखील दाम मिळायला हवे, ही भावना नागरिकांची देखील असायला हवी, असेही भुसे यांनी सांगितले.