त्र्यंबक-हरसूल मार्गावर अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:21 IST2020-12-04T23:00:46+5:302020-12-05T00:21:36+5:30
त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

त्र्यंबक-हरसूल मार्गावर अपघातात एक ठार
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ३) सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर - हरसूल रस्त्यावर वेळुंजे शिवारात ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन मोटरसायकलवरील विशाल फुलचंद जाधव (२२) व फुलचंद जाधव (५०) रा. वेळे, ता.त्र्यंबकेश्वर हे मुलगा व वडील गंभीर जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासले असता विशाल फुलचंद जाधव याचा मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी फुलचंद जाधव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातून खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, गुन्हा दाखल केलेला आहे. ट्रॅक्टर मुळेगाव येथील असून, तळेगाव (अंजनेरी) रस्त्याने हरसूलकडे जात होता. ट्रॅक्टरवरील नंबर पुसट असल्याने तो स्पष्ट दिसत नव्हता. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार कैलास अहिरे करीत आहेत.