नाशिक जिल्ह्यात वनविभाग लावणार १कोटी २७ लाख रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:33 IST2019-06-30T17:32:34+5:302019-06-30T17:33:11+5:30
राज्यातील वनजमिनी व वनइतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून राज्य सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यभरासाठी निश्चित करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात वनविभाग लावणार १कोटी २७ लाख रोपे
नाशिक : राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून राज्यभरात वनविभागाच्या सर्व फोरम व अन्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांद्वारे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सोमवारी (दि.१) प्रारंभ केला जाणार आहे. याअंतर्गत वनविभागाच्यानाशिक वनवृत्तासाठी एक कोटी २७ लाख रोपे लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांना एकूण सुमारे एक कोटी ९२ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण करावयाचे आहे.
राज्यातील वनजमिनी व वनइतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून राज्य सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यभरासाठी निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर असा कालावधी या अभियानाचा ठरविण्यात आला आहे. पावसाळ्यात वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने जनसामन्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि रोपे लागवडीची चळवळ व्यापक बनावी, हा यामागील उद्देश असल्याचे नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले.
नाशिक पश्चिम विभागाकडून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले या गावी वनजमिनीवर १५ हेक्टर जागेत सुमारे साडेसोळा हजार रोपे लावण्यात येणार आहे. या ठिकाणाहून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्हाभरात सर्व ग्रामपंचायतींनाही त्यांच्या हद्दीत रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मिळून सुमारे ४४ लाख २४ हजार रोपे लावायची आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट्य पूर्ण करावयाचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे मोफत पुरविली जाणार आहेत.