जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी
By Admin | Updated: April 9, 2015 00:28 IST2015-04-09T00:19:24+5:302015-04-09T00:28:26+5:30
सिद्धिविनायक न्यासची देणगी : सकारात्मक प्रतिसादाने अभियान यशस्वी होण्याची अपेक्षा

जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी
नाशिक : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाच्या वतीने एक कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते धनादेश स्वीकारला. यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एन. जगताप व न्यासाचे विश्वस्त हरिश सनस उपस्थित होते.
यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी संस्था आणि उद्योजकांच्या सकारात्मक प्रतिसादाने अभियान यशस्वी होईल. न्यासाने दिलेल्या निधीतून अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवडलेल्या गावात कामे केली जातील, तर त्या गावांना भेट देऊन संस्थादेखील तेथील प्रगत कामांची पाहणी करू शकेल. जिल्ह्यात अभियानासाठी शिर्डी संस्थानने एक कोटी रुपये सहाय्य करेल, तर कोकाकोला कंपनीने १ कोटी ४0 लाख रुपयांची कामे वॉटर संस्थेमार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. न्यासाचे अध्यक्ष राणे यांनी राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी असे ३४ कोटी रुपये अभियानासाठी देण्यात येतील, असे सांगितले. या माध्यमातून राज्यातील गावे टंचाईमुक्त करण्यास मदत होईल, असे सांगितले.
उपजिल्हाधिकारी गाडीलकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कामांसाठी ३६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगून यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत ५८ कोटी रुपये, तर जूनपासून मार्चपर्यंत १0२ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यामध्ये सीमेंट बंधारे, शेततळे, वनीकरण व पाणलोटसंबंधी कामे केली जातील, असेही गाडीकर यावेळी म्हणाले. राज्य शासनाने येत्या ५ वर्षांत २५हजार गावे टंचाईमुक्त करण्यासाठी दरवर्षी ५ हजार गावांमध्ये शासनाने विविध विभागांच्या माध्यमातून विविध कामे हाती घेतली आहेत. शासनाने स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक आदिंना अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.