ओझरला विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:46 IST2018-12-24T00:46:38+5:302018-12-24T00:46:59+5:30
ओझर येथील २९ वर्षीय महिलेने शुक्रवारी आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्याने तिच्या पती व दिरास ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ओझरला विवाहितेची आत्महत्या
ओझरटाउनशीप : ओझर येथील २९ वर्षीय महिलेने शुक्रवारी आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्याने तिच्या पती व दिरास ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडू श्रावण खैरनार (वय ६३, रा. उंटवाडी सिडको नाशिक) यांची मुलगी गायत्री हिचा विवाह २४ जानेवारी २०११ रोजी बाबुलाल विठ्ठल गाडेकर यांचा मुलगा कृष्णा (रा. नगरसूल, ता. येवला) याच्याबरोबर मोठया थाटात झाला. कृष्णा हा एचएएलमध्ये कामांस असल्याने तो पत्नीसोबत काही दिवस टाउनशीपमध्ये राहत होता. त्यांना २०१५ मध्ये विहान हा मुलगा झाला. दरम्यान, कृष्णाला दारू आणि सिगारेटचे व्यसन लागले. त्यावरून नवरा-बायकोत नेहमी खटके उडत होते. अनेक वेळा कृष्णा हा गायत्रीस मारझोडही करीत असे. आज ना उद्या जावई सुधारेल म्हणून वडील गायत्रीची समजूत काढून तिला ओझरला आणून घालायचे. गायत्रीचा भाऊ संकेत हा कॅनडा येथे नोकरीस आहे. तोही बहिणीला नेहमी मदत करायचा.
मला घर बांधायचे आहे त्यासाठी तुङया वडिलांकडून अडीच लाख रु पये आण म्हणून कृष्णाने जानेवारी २०१६मध्ये गायत्रीला मारझोड करून काढून दिले. याबाबत खैरनार यांनी कृष्णाचे वडील, भाऊ व सासू यांना सांगितले मात्र त्यांनी तुमच्या मुलीचीच चूक आहे असे सांगून तुमच्या मुलीला समजून सांगा किंवा फारकत घ्या, असे सांगितले. मयत गायत्रीला सासरा बाबुलाल याने तुझ्याकडे बघतो, असा दमही दिला होता. सन २०१८ला गणेशोत्सवात कृष्णाने गायत्रीला मारझोड केली. यात तिचा हात मोडला होता. १३ डिसेंबर २०१८ रोजी कृष्णाने पुन्हा मारझोड केली.
पोलीस पंचनाम्यात गायत्रीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने सासू जिजाबाई, सासरे बाबुलाल, पती कृष्णा, जेठ दत्तू व दीर अमोल यांनीच मला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचा मजकूर आहे. तिचा मुलगा विहान यानेही वडील मम्मीला व मला नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची जबानी दिली आहे.