तेल्या रोगामुळे सात एकर डाळिंब बाग तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 00:54 IST2021-10-09T00:54:03+5:302021-10-09T00:54:40+5:30
मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

ब्राह्मण गाव येथे तोडलेली डाळिंबाची बाग
ब्राह्मणगाव : मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.
गेल्या तीन चार महिन्यांपूर्वीच डाळिंब बागेवर तेल्या, मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार-पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला आहे. सततच्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक व तंटा मुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानदेव दोधू अहिरे यांनी डाळिंबाची बाग, तर मविप्र शिक्षण संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांची शेतातील डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट काढून टाकली. नैसर्गिक आपत्तीबरोबर सततच्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब फळ पिकावर मोठी अवकळा आली असून, त्यामुळे बऱ्याच द्राक्ष व डाळिंब बाग कुऱ्हाडीने बुडा सकट तोडून टाकल्या जात आहेत. यामुळे परिसरातील डाळिंब, द्राक्षबागांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्या असून, शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. खरे पाहता फळबागांविनाच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली होती.
------------------------
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
गेल्या चार-पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती व्यवसाय करत आहे. मात्र सध्या अचानक येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पन्नापेक्षा मिळणारा भाव, यात होणारे सर्व नुकसान याला कंटाळून या आधी ये थिल डाळिंब उत्पादक रमेश अहिरे, चंद्रकांत अहिरे, योगेश अहिरे यांनीही डाळिंब बाग व द्राक्षबाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट तोडून टाकल्या आहेत. त्यातच पुन्हा डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांची सात एकर क्षेत्रातील डाळिंब बाग तोडली असल्याने गावातील डाळिंब बागांचे क्षेत्र संपुष्टात येण्याचे स्थितीत आहे.
-----------------------