वाळू चोरीचे कारनामे पाहून अधिकारी अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 23:07 IST2016-01-21T23:06:47+5:302016-01-21T23:07:13+5:30
ट्रकचे बनावट क्रमांक : गोणपाटात भरली वाळू

वाळू चोरीचे कारनामे पाहून अधिकारी अवाक्
नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील देशमाने पेट्रोलपंपालगत महसूल विभागाने पकडलेल्या बेकायदेशीर वाळू साठ्यातून वाळू चोरीच्या अनेक नवनवीन कल्पना उघडकीस आल्या असून, वाळू तस्करांनी वाहतूक करण्यासाठी बनावट क्रमांकाची वाहने वापरण्याबरोबरच संशय येऊ नये म्हणून वाळू पोत्यात भरून त्याची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. वाळू तस्करांच्या या क्लृप्त्या पाहून अधिकाऱ्यांनीही तोंडात बोटे घातली आहेत.
बुधवारी सायंकाळी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, गौणखनिज अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी पिंपळगाव बसवंत येथील दीपक बनकर यांच्या शेतगटात छापा मारून सुमारे १२९ ब्रास वाळू, अकरा वाहने असा कोट्यवधी रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलीप अर्जुन गुंजाळ (रा. साकोरे) व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात संगनमताने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, ज्यावेळी अधिकाऱ्यांनी वाळूचा साठा जप्त केला त्यावेळी अनेक नवनवीन गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. यातील काही वाहनांवर वेगवेगळे क्रमांक टाकल्याचे आढळून आले, तर काही वाहनांचे क्रमांक संशयास्पद व खाडाखोड केलेले दिसून आले. त्याचबरोबर वाळू भरण्यासाठी खडी क्रशरसारखा प्लान्ट लावण्यात आल्याचेही आढळून आले. या ठिकाणी वाळू स्वयंचलित यंत्रातून चाळणी करून पाण्याने धुतली जात असल्याचे व तेथून थेट यंत्राद्वारे ती पोत्यांमध्ये भरली जात होती. अशा प्रकारे तीन मालट्रकमध्ये धान्याप्रमाणे गोणपाटात वाळू भरून ठेवण्यात आल्याचे पाहून अधिकारीही बुचकळ्यात पडले.
या प्रकरणी जिल्हा गौणखनिज अधिकारी गणेश राठोड यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पत्र पाठवून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांकाच्या आधारे त्यांचे मालक व खऱ्या क्रमांकाचा शोध घेण्याची विनंती केली
आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या मते काही वाहनांना दुचाकीचे बनावट क्रमांक लावण्यात आलेले असावेत जेणे करून वाळूची चोरी करून पळून गेलेल्या वाहनाची नंबर प्लेट तत्काळ बदलणे शक्य होते. (प्रतिनिधी)