तीन महिन्यांत २० मातांचे ‘माहेरघरी’ बाळंतपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:22 IST2019-07-21T17:21:38+5:302019-07-21T17:22:48+5:30
नाशिक : आदिवासी आणि दुर्गम भागातील मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘माहेरघर’ ही योजना लाभदायक ठरत आहे. जिल्ह्यात पेठ आणि ...

तीन महिन्यांत २० मातांचे ‘माहेरघरी’ बाळंतपण
नाशिक : आदिवासी आणि दुर्गम भागातील मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘माहेरघर’ ही योजना लाभदायक ठरत आहे. जिल्ह्यात पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून तीन महिन्यांत सुमारे २० मातांचे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. दरम्यान, या केंद्रांचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी शासकीय पातळीवर महिलांमध्ये जनजागृतीदेखील केली जात आहे.
आदिवासी, दुर्गम तसेच डोंगराळ भागातील गर्भवती महिलांचे बाळंतपणात होणारे मृत्यू रोखण्यासाठी त्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळाव्यात, पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळावे तसेच त्यांना शारीरिक कष्ट होऊ नये यासाठी ‘माहेरघर’ उपक्रम राबविला जातो. बाळंतपणासाठी माहेरी येणाऱ्या मुलीची ज्याप्रमाणे माहेरवासीय काळजी घेतात त्या धर्तीवर या योजनेत महिलांची काळजी घेतली जाते. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील जोगमोडी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘माहेरघर’ कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
‘माहेरघर’ या नावातच या योजनेची संकल्पना असून, गर्भवती महिलांना माहेरघरी आल्यासारखे वाटावे, त्यांची काळजी घेतली जावी यासाठी सदर योजना राबविली जाते. यातून योग्य औषधोपचार, आहार आणि आरोग्याची काळजी घेतली जाते. प्रसूतीपूर्वी किमान तीन दिवस अगोदर आणि प्रसूतीनंतरच्या दोन ते तीन दिवस माता माहेरघरात राहू शकते.
पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांतील ९० प्राथमिक आरोग्य केंद्रांत ही योजना सुरू आहे. राज्यात वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले आहे. दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकिरीचे बनते. त्यामुळे प्रसूतीच्या चार ते पाच दिवस आधी गर्भवतींना आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना माहेरघर योजनेतून सर्वंकष सेवा दिली जाते.