...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:29 IST2020-03-23T18:25:34+5:302020-03-23T18:29:59+5:30
या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे.

...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब
नाशिक : शहरातील बहुतांश मुख्य दर्गांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१मार्चप्रर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५०पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी मौलवींच्या बैठकीत घेतला. यामुळे आता मशिदींमध्ये दिवसाच्या तीन प्रहरांमध्ये पाचवेळा होणाऱ्या नमाजपठणाला केवळ चार ते सहा लोक (मौलवींसह) हजर राहतील असे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनी संपुर्णत: सहकार्य करावे, कोणीही घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारचे सर्व आदेश हे जनतेच्या आरोग्याचय हिताचे असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून आपआपल्या घरातच थांबावे,असेही खतीब यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, वडाळारोड, देवळाली कॅम्प, विहितगाव, सातपूर या सर्व भागांमधील मशिदींमध्येही नमाजपठणासाठी नागरिकांना जाता येणार नाही. नागरिकांनी नमाजपठणाकरिता घराबाहेर पडू नये, पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे. कोरोना आजार हा अत्यंत जीवघेणा असून या आजारापासून स्वत:सह आपले कुटुंब आणि परिसराला सुरक्षित ठेवण्याकरिता सर्व शहरासह उपनगरांमधील नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच थांबणे गरजेचे आहे. मशिदींमध्ये केवळ मौलवी, मोअज्जिन (सेवेकरी) आणि दोन ते तीन ज्येष्ठ नागरिकच नमाजपठणाकरिता जाऊ शकतात. सर्व मशिदींमध्ये स्वच्छतेविषयक खबरदारी घेतली गेली आहे.