राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:40 IST2025-08-10T13:40:10+5:302025-08-10T13:40:20+5:30
बाळासाहेब थोरातांची बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी

राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
नाशिक : राज ठाकरे यांना मुंबई महापालिकेसाठी महाआघाडीत घेण्याच्या प्रस्तावावर आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याबाबत एकत्रित बसून चर्चा झाल्यानंतरच ठरवले जाईल, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले. याशिवाय आयोगावर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.
आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, अलीकडच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. अनेक ठिकाणी खोटे मतदान, ओळखपत्रांचे अनियमित वाटप, एकाच नावाने विविध मतदारसंघांत मतदान झाल्याच्या तक्रारी आम्ही केल्या. निवडणूक आयोग मात्र उत्तर देत नाही. ४५ दिवसांत सर्व पुरावे नष्ट करण्याचा निर्णय का घेतला, हा मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे महाआघाडीत येत असल्याच्या चर्चेवर याबाबत प्रस्ताव आलेला नाही, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आमच्या नेत्यांशी एकत्रित चर्चेनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे काही एजंट ईव्हीएमसंदर्भात फिरत असतील, तर लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. शंका निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाने निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेणे गरजेचे आहे. यासाठी आगामी सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करतानाच नरेंद्र मोदींनीही कधीकाळी बॅलेट पेपरची मागणी केली होती, असे ते म्हणाले.
सिंहस्थ कुंभासाठी निधी वाटपाबाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. 'अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. ठेकेदार आत्महत्या करत आहेत. निराधार योजनांचे लाभार्थी महिनोंमहिने पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार विरोधी आमदारांच्या मतदारसंघांना निधी देत नाही, हे गरीब जनतेसोबतचे राजकारण आहे,' असा आरोप थोरात यांनी केला.