पुढील चार तास या जिल्ह्यांत संततधार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 16:36 IST2019-08-08T16:34:23+5:302019-08-08T16:36:22+5:30
नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची संततधार सुरू होऊ शकते

पुढील चार तास या जिल्ह्यांत संततधार...
नाशिक : गोदापात्रात दोन दिवसांपासून अडीच हजार क्युसेक पाण्याचा गंगापूर धरणातून विसर्ग केला जात होता; मात्र गुरूवारी (दि.८) सकाळी विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. सकाळपासून गोदापात्रात ५हजार १०२ क्ुयसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस जिल्ह्यातील घाट प्रदेशात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविल्याने गोदाकाठाला पुन्हा सतर्कतच्या सूचना दिल्या गेल्या. तसेच हवामान खात्याकडून नुकत्याच मिळालेल्या संदेशानुसार पुढील चार तास जोरदार संततधार सुरू होण्याची शक्यता आहे.
शहरात दुपारी चार वाजेपासून पुढील चार तास संततधारेचा वर्षाव होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची संततधार सुरू होऊ शकते, असा इशारा मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये थंड वारे वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
गुरू वारी सकाळपर्यंत गंगापूरमध्ये ८२, काश्यपीत ३२, गौतमीमध्ये ७६ तर त्र्यंबकमध्ये ९२ आणि अंबोलीत७९ मि.मी पावसाची नोंद झाली. यामुळे गंगापूरमध्ये नव्याने ३८६दलघफू पाणी पोहचले. त्यामुळे २ हजार ८०० वरून विसर्ग ५ हजार १००पर्यंत वाढविला गेला. गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.