वार्ताफलक, शाखाफलकही हटणार
By Admin | Updated: January 19, 2016 23:28 IST2016-01-19T23:27:57+5:302016-01-19T23:28:48+5:30
पालिकेची मोहीम : राजकीय पक्षांना प्रशासनाचे पत्र

वार्ताफलक, शाखाफलकही हटणार
नाशिक : मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर्स आदि २६ जानेवारीपर्यंत हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेमार्फत युद्धपातळीवर मोहीम सुरू असून, राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी, चौकाचौकांत उभारलेले शाखा उद्घाटनांचे फलक, वार्ताफलकही काढून घेण्याचे पत्र प्रशासनाने प्रत्येक पक्षाच्या शहराध्यक्षांना पाठविले आहे. वार्ताफलकांसह शाखा फलकांवरही गंडांतर आल्याने राजकीय पक्षांकडून या कारवाईला विरोध होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेनुसार महापालिकेला दि. २६ जानेवारीपूर्वी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर्स, झेंडे हटवायचे आहेत. नाशिक महापालिकेने दि. २६ जानेवारीला ‘नो होर्डिंग्ज डे’ पाळण्याचे ठरविले आहे. महापालिकेमार्फत शहरातील सहाही विभागांत अनधिकृत होर्डिंग्जविरोधी कारवाई सुरू असतानाच प्रशासनाने शहरातील सर्व राजकीय पक्ष-संघटनांच्या शहराध्यक्षांनाही पत्र पाठवून अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्याचे आवाहन केले आहे अन्यथा यापुढे मनपा क्षेत्रात राजकीय पक्ष संघटना यांना कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचाही इशारा दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने शहरात राजकीय पक्ष संघटनांनी ठिकठिकाणी, चौकाचौकांत, रस्त्यालगत उभारलेले शाखा उद्घाटनांचे फलक, वार्ताफलकही हटविण्याचे आवाहन केले आहे. शहरात प्रत्येक राजकीय पक्षांच्या वॉर्ड तेथे शाखा असून, शाखा स्थापनेचे हजारो फलक आहेत. महापालिकेकडून सदर फलक हटविण्याची कार्यवाही झाल्यास पक्षकार्यकर्त्यांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. याशिवाय, शहरात अनेक नगरसेवकांसह सामाजिक संस्थांकडून वार्ताफलक, लोकफळा आदि उपक्रम राबविले जात आहेत. या सामाजिक उपक्रमाकडेही महापालिकेची वक्रदृष्टी पडल्याने त्यालाही विरोध होण्याची शक्यता आहे.