रेल्वे अपघाताची बातमी पसरली अन् लोक धावले; सरतेशेवटी जीव भांड्यात पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:02 IST2023-02-22T15:00:32+5:302023-02-22T15:02:13+5:30
रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये प्रथम धावत्या रेल्वे गाडीचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले.

रेल्वे अपघाताची बातमी पसरली अन् लोक धावले; सरतेशेवटी जीव भांड्यात पडला
अशोक बिदरी
मनमाड ( नाशिक ) : धावत्या रेल्वेचा अपघात झाल्यावर निर्माण झालेल्या अपातकालीन परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे यासाठी मनमाड रेल्वे स्थानकाजवळील लोकाशेड जवळ रेल्वेच्या भुसावळ विभाग व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोकड्रिल करण्यात आले. यावेळी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग दिसून आला.
रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये प्रथम धावत्या रेल्वे गाडीचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले. या दुर्घटनेच्या वेळी रेल्वेच्या सर्व विभागाचे कर्मचारी तसेच एनडीआरएफने युद्धपातळीवर मदतकार्य राबवित परिस्थिती नियंत्रणात आल्याची थरारक हुबेहुब प्रात्याक्षिके सादर केले. तसेच गाडीच्या डब्याला लागलेली आगही नियंत्रणात आणल्याचे प्रात्यक्षिके दाखविले. अचानक झालेले भोंगे, व रुग्णवाहिकेच्या धावपळीमुळे काही काळ शहरात संभ्रम निर्माण झाला होता. शहरात रेल्वे अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, हे रेल्वे प्रशासनाचे मॉकड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.