...तरीही पोलीस कर्तव्य’दक्ष’; हुल्लडबाजीवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 18:19 IST2020-03-22T18:17:01+5:302020-03-22T18:19:40+5:30
पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आपले कर्तव्य बजावले. चार उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची वाहनांमधून गस्त सुरू होती

...तरीही पोलीस कर्तव्य’दक्ष’; हुल्लडबाजीवर करडी नजर
नाशिक : शहरात रविवारी ‘जनता कर्फ्यू’ नाशिककरांनी जरी शंभर टक्के स्वयंस्फूर्तीने पाळला असला तरी शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची नियमितगस्ती पथके सक्रिय असल्याचे दिसून आले. रस्ते निर्मनुष्य झाल्यामुळे काही टवाळखोरांकडून भरधाव दुचाकी दामटवित हुल्लडबाजी होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी गस्त सक्रिय ठेवली होती.
शहरात रविवारी सकाळपासून सर्वत्र निरव शांतता अनुभवयास आली. यामुळे कोठेही कुठल्याहीप्रकारचा अनुचित प्रकार घडल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी झाली नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी जणू स्वत:ला स्वयंस्फूर्तीने एकप्रकारे कोंडूनच घेतले. यामुळे शहरातील गल्लीबोळांनी मोकळा श्वास घेतला. बाजारपेठा बंद राहिल्याने कोठेही वर्दळ पहावयास मिळाली नाही. यामुळे पोलिसांवर एरवी असणारा बंदोबस्ताचा ताण तसा फारसा कमी झाल्याचे जरी रविवारी दिसून आले असले तरीदेखील पोलिसांची नियमित गस्त अन्् शहरावर लक्ष होते. नागरिकांनी घरात राहणे पसंत केले तरी शहरात कुठल्याही प्रकारचा कायदासुव्यवस्थेला समाजकंटकांकडून तडा जाऊ नये, म्हणून पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आपले कर्तव्य बजावले. चार उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची वाहनांमधून गस्त सुरू होती. याचप्रमाणे गल्लीबोळात बीट मार्शल पोलीसदेखील दुचाकींवरून गस्तीवर होते. गोदाकाठावरही पोलिसांचा पहारा नजरेस पडला. जुनेनाशिकसह सर्वच भागात कायदासुव्यवस्था सुरक्षित राहिल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत नागरिक घराबाहेर पडलेले नव्हते.