नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यास वरदान ठरलेल्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेचे दारणा नदीपात्रातील उद्भव ठिकाण कोरडेठाक झाल्याने सदर योजनेचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प झाला आहे. नायगाव खोऱ्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.नायगाव खोऱ्यातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह व मोहदरी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेकदा विस्कळीत होत होता. याशिवाय मुख्य जलवाहिनीतून होणाऱ्या पाणीचोरीमुळे ही योजना वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाऱ्यात असलेले योजनेचे उद्भव ठिकाणच कोरडे झाल्याने ही योजना संकटात सापडली आहे. त्यामुळे नायगाव खोऱ्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे. (वार्ताहर)
नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना ठप्पं
By admin | Updated: April 30, 2017 00:25 IST