सलग सुट्यामुळे नाशिकची हॉटेल्स फुल्ल! पर्यटनस्थळांवर गर्दी
By Sandeep.bhalerao | Updated: August 14, 2023 17:53 IST2023-08-14T17:52:29+5:302023-08-14T17:53:59+5:30
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचा निसर्गरम्य परिसर, खळखळणारे धबधबे, धरणांचा परिसर, गड किल्ले पाहण्यासाठी पर्यटक नाशिकला आले आहेत.

सलग सुट्यामुळे नाशिकची हॉटेल्स फुल्ल! पर्यटनस्थळांवर गर्दी
नााशिक: सलग शासकीय सुट्या असल्याने नाशिक शहरात पर्यटकांची गर्दी वाढली असून हॉटेल्सचे बुकिंग फुल्ल झाले आहे. गेल्या शनिवारपासूनच पर्यटकांनी नाशिकमध्ये मुक्काम ठोकला असल्याने नाशिकलगतच्या पर्यटनस्थळांवरील गर्दीत वाढ झाली आहे. गोदाघाट तसेच श्री काळाराम मंदिरात सायंकाळी भाविकांची गर्दी झाली होती.
शनिवार, रविवार साप्ताहिक सुटी, सोमवारी वर्किंग डे असला तरी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि १६ ऑगस्टला पतेतीची शासकीय सुटी असल्यामुळे सलग चार दिवसांच्या सुटीची पर्वणी साधत पर्यटकांनी नाशिकची वाट धरली आहे. गुजरात, ठाणे आणि मुंबई शहरातील पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बहुतांश हॉटेल्स फुल्ल झाले असून ऑनलाईन बुकिंगमुळे ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांना चांगले हॉटेल मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचा निसर्गरम्य परिसर, खळखळणारे धबधबे, धरणांचा परिसर, गड किल्ले पाहण्यासाठी पर्यटक नाशिकला आले आहेत. पहिने, अंजनेरी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची संख्या माेठी असल्याने या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक गर्दी झाली असून त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावरच वाहनांच्या रांगा लागत आहेत. येथील श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री गजानन महाराज देवस्थान तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह शिर्डी, वणी, त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ झाल्याचे दिसत आहे. गोदावरी, रामकुंड परिसर तसेच श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढलेली आहे. केवळ त्र्यंबकेश्वर, इगतपुरी मार्गावरीलच हॉटेल्स, रिसॉर्ट फुल्ल झाले असे नाही तर शहरासह नाशिक-पुणे रोड, आग्रारोड, मार्गावरील हाॅटेल्स देखील फुल्ल झाले आहेत. गंगापूर परिसरातील रिसॉर्टमध्येही गर्दी वाढली असून वाईन्स कारखान्यांमध्ये पर्यटकांची पावले वळत आहेत.