नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:39 IST2026-04-08T11:37:06+5:302026-04-08T11:39:46+5:30
खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
नाशिक: महिलांचे शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिकचा स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत आहे. सुरुवातीला पोलिसांना "तुम्ही पाप करत आहात" असे म्हणत शाप देणारा आणि राजकीय वरदहस्ताचा माज दाखवणारा खरात आता पुरता खचला असून, कोठडीत तो चक्क रडत असल्याची माहिती समोर आली आहे.
पायाखालची जमीन सरकली!
अटक झाल्याच्या पहिल्या आठवड्यात खरातचा आत्मविश्वास दांडगा होता. आपल्यामागे राजकीय शक्ती असल्याने आपण लवकरच बाहेर पडू, अशा भ्रमात तो होता. चौकशी करणाऱ्या एसआयटी अधिकाऱ्यांशी तो हुज्जत घालत होता. मात्र, जसजसा तपासाचा फास आवळला गेला आणि नवनवीन गुन्हे समोर येऊ लागले, तसा त्याचा तोरा उतरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली सुटका होणे कठीण असल्याचे लक्षात येताच तो कोठडीत दोन-तीन वेळा ढसाढसा रडला आहे.
आज न्यायालयात हजर करणार
खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. एका पीडितेवर अत्याचार करून तिला गर्भवती करणे आणि नंतर तिचा गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या गंभीर गुन्ह्यात त्याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी, अशी विनंती एसआयटीने न्यायालयाला केली आहे.
आतापर्यंत खरातवर एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ८ गुन्हे महिला अत्याचाराचे तर ४ गुन्हे फसवणुकीचे आहेत. अनेक महिलांच्या जमिनी आणि मालमत्ताही त्याने दहशतीखाली बळकावल्याचे समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करत आहे.