nashik,revision,of,voter,lists,in,the,next,day | दुसऱ्या दिवशीही मतदार याद्यांचे पुनरीक्षण
दुसऱ्या दिवशीही मतदार याद्यांचे पुनरीक्षण

ठळक मुद्देअडीच हजार अर्ज : कळवणला सर्वाधिक मतदारांचा पुढाकार


नाशिक : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कामाच्या विशेष मोहिमेत दुसऱ्या दिवशीही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी या मोहिमेंतर्गत सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक अर्ज दुरुस्तीसाठी प्राप्त झाले होते. रविवारीदेखील दुपारपर्यंत सुमारे दीड हजार अर्ज प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यात मतदार यांद्याच्या पडताळणीचे काम विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे. मयत आणि दुबार मतदारांच्या नावांची शोध मोहीम अत्यंत व्यापक आणि जनमानसात जनजागृती निर्माण करणारी ठरली. या मोहिमेत ४० हजारांपेक्षा जास्त दुबार नावे यादीतून काढून टाकण्यात आली तर नवीन २८ हजार नावांची नोंदणीदेखील झाली. आता या मोहिमेतील पुढचा टप्पा म्हणजे मतदार नोंदणी आणि दुरुस्तीसाठीची विशेष मोहीम. शनिवार (दि.२०) पासून सुरू झालेली मोहीम रविवारीदेखील सुरू होती.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आणि मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये सदर विशेष मोहिमेला सुरुवात झालेली आहे. रविवारीदेखील जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांनी येऊन आपली माहिती जाणून घेतली, तसेच नवीन नावनोंदणीदेखील करण्यात आली. गेल्या १५ जुलै रोजी प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी घेऊन नोंदणी, दुरुस्तीच्या कामाला कर्मचारी हजर झाले होते.
या मतदार नोंदणी विशेष अभियानातून प्राप्त होणारे अर्ज क्रमांक ६, ७, ८ तसेच ८अ चे वितरण जिल्हा निवडणूक शाखेस सादर केले जाणार आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्हा निवडणूक शाखेत याबाबतचे काम सुरू होते. श्निवार दि. २० रोजी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबवायच्या विशेष मोहिमेत प्राप्त झालेल्या मतदारांच्या अर्जांच्या माहितीनुसार कळवणमध्ये सर्वाधिक ६४३ मतदारांनी दुरुस्ती आणि तपासणीसाठी आग्रह धरला आहे.


Web Title: nashik,revision,of,voter,lists,in,the,next,day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.