एचआयव्ही दडवून सासरच्यांनी विवाह लावल्याचा विवाहितेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:15 IST2018-03-14T19:14:19+5:302018-03-14T19:15:04+5:30

एचआयव्ही दडवून सासरच्यांनी विवाह लावल्याचा विवाहितेचा आरोप
नाशिक : विवाहापूर्वी वरास एचआयव्ही (एड्स) झाल्याची माहिती दडवून विश्वासघाताने या वरासोबत विवाह लावून देणाऱ्या सासरच्यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच कौटुंबिक छळाची फिर्याद दिली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये मुंबई नाका परिसरातील एका युवकासोबत अहमदनगर जिल्ह्यातील एका युवतीचा विवाह झाला़ विवाहानंतर सासरी नांदत असताना सासरच्या चौघा संशयितांनी तुझ्यामुळेच आमच्या मुलाला एचआयव्ही (एड्स) झाला, असा आरोप करून मारहाण तसेच शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली़
एड्समुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्यास विवाहापूर्वीच एड्स असल्याचा आरोप विवाहितेने केला असून, एड्स असल्याची माहिती लपवून ठेवत सासरच्यांनी आपल्यासोबत विवाह लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़