शिक्षणाचा कट्टा; ठरू नये अड्डा (विश्लेषण)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 17:52 IST2019-08-23T17:45:48+5:302019-08-23T17:52:05+5:30
विद्यार्थ्यांनी मराठी शाळेकडे का वळावे? असा प्रश्न ज्या ठामपणाने उपस्थित केला जातो तितक्या सक्षमतेने उत्तर देण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने ...

शिक्षणाचा कट्टा; ठरू नये अड्डा (विश्लेषण)
विद्यार्थ्यांनी मराठी शाळेकडे का वळावे? असा प्रश्न ज्या ठामपणाने उपस्थित केला जातो तितक्या सक्षमतेने उत्तर देण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने निर्माण केलेली नाही, हे खेदाने म्हणावे लागत आहे. खरेतर शिक्षणाच्या शाश्वत धोरणांची नितांत गरज असताना शिक्षणक्षेत्र सध्या प्रयोगशाळा बनून राहिली आहे. आज घेतलेला निर्णय उद्या कायम राहील किंवा दीर्घकालीन परिणाम दिसू शकेल, असा ठाम निर्णय होताना दिसत नाही. ज्या काही सुधारणा आणि उपक्रम सध्या सुरू आहेत त्या ‘डाउन’ झालेल्या आहेत. त्यामुळेच शिक्षणाचा ‘कट्टा’ या उपक्रमाकडून अपेक्षा करणेही गैर ठरते.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे काही शिक्षक आहेत की ज्यांनी स्वत: अध्यापनाची नवी पद्धत अमलात आणली आणि त्यामुळे मुलांना शिक्षणात गोडी वाटू लागली. अवघड वाटणारे विषय सोपे झाले तर मुलांमधील गणिताची भीती पळून गेली. हे शिक्षक त्या शाळेपुरते मर्यादित न राहता त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतर शिक्षकांना व्हावा या हेतूने ‘कट्टा’ सुरू झाला ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. नाशिक जिल्हा परिषदेत झालेल्या या कट्ट्यावर शिक्षकांची प्रयोगशीलता किती झिरपली हे सांगणे अवघड आहे. कारण ऐकणारे सारे शिक्षक होते आणि उस्फूर्तपणे संकल्पना ते मांडू शकले हे सांगणेदेखील कठीण आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी याबरोबरच मराठी शाळेतील अध्यपन पद्धतीमुळे शिक्षणाचा नवा अध्याय सुरू होण्याच्या संकल्पनेतून ‘शिक्षणाचा कट्टा’ उपक्रम सुरू होणे हा खरा तर शुभसंकेतच. मात्र उपक्रम झाल्यानंतर त्याचे पुढे काय याचा आढावा घेणारी यंत्रणा आहे तरी कुठे? प्रत्येक तालुक्यातून किमान दहा म्हणजेच किमान दीडशे शिक्षकांनी हॉल भरणे अपेक्षित आहे. हॉलमध्ये खरेच सारे शिक्षक असतात? याची शाश्वती कोण देणार?
शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाचे यशापयश हे अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. शैक्षणिक कार्यक्रमातील एक उपक्रम म्हणून केवळ संख्यात्मक पातळीवर याकडे पाहिले गेले तर एका मोठ्या बदलाच्या चळवळीला नख लागण्यासारखे ठरणारे आहे. एका शिक्षकाकडून दुसरा शिक्षक प्रेरणा घेऊन तो कौशल्यपूर्ण अध्यापन पद्धतीत आपल्या मुलांना देईल हा आशावाद बाळगणे गैर नाही. उगाच परिक्रमा करण्यापेक्षा कट्ट्यावरील तज्ज्ञ शिक्षकालाच जर शाळांवर बोलावून प्रत्यक्ष शिकविण्याची संधी दिली तर एका नव्या पर्वाला सुरुवात होऊ शकते. एखाद्याला जमले म्हणजे ते प्रत्येक शिक्षकालाच जमेल असे नाही. ज्याचे ज्यात कौशल्य आहे त्याला संधी दिली पाहिजे. केवळ प्रबोधनाने अन्य शिक्षक प्रेरणा घेऊन तसेच अध्ययन करतील हा फसवा आशावाद ठरू शकतो. ‘शिक्षणाचा कट्टा’ केवळ कट्टा न राहता त्याला चाके लावून जिल्हाभर तज्ज्ञ शिक्षकांची वारी फिरली पाहिजे अन्यथा शिक्षणाचा कट्टा केवळ अड्डा बनून राहील. हे कुणालाही मान्य होणारे नाही.
या कट्टयाकडे पाहतांना एक प्रकर्षाने लक्षात येते की शिक्षण विभाग याकडे केवळ एक उपक्रम म्हणून पाहाणार असेल आणि त्याच्या निष्कर्षाप्रत पोहचणार नसेल तर सारेच व्यर्थ ठरेल. मुळात प्रयोगशील शिक्षकांना बोलावून त्यांचे निव्वळ ऐकून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांची अध्ययन पद्धती त्यांच्या शाळेत किंवा आपल्या शाळेत बोलावून खात्री करून घेता येईल. दुसरी बाब म्हणजे शिक्षकांना आणखी काय नवीन संकल्पना सुचली यावर त्यांना देखील बाजू मांडण्याची संधी दिल्यातर कल्पनांचे देवाण-घेवाण होऊ शकेल. केवळ एक कट्टा म्हणूनच या संकल्पनेकडे पाहिले तर त्याची थट्टा नक्कच होईल. हा कट्टा कट्टा न रहाता विचारांचा कल्पकता अध्ययनाचे बिजारोपण करणारे ठरो इतकेच.