एशियन क्रॉसकंट्रीत संजीवनीला ब्रॉँझ पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:51 IST2018-03-15T19:51:42+5:302018-03-15T19:51:42+5:30
चीन येथे झालेल्या १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉँझ पदक पटकावत भारताला पदक मिळवून दिले. चीन आणि जपानच्या धावपटूंना कडवे आव्हान देत संजीवनीने तिसरे स्थान मिळविले

एशियन क्रॉसकंट्रीत संजीवनीला ब्रॉँझ पदक
आंतराष्ट्रीय पदक : पूनम सोनुनेही सहाव्या क्रमांकावर
नाशिक : चीन येथे झालेल्या १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉँझ पदक पटकावत भारताला पदक मिळवून दिले. चीन आणि जपानच्या धावपटूंना कडवे आव्हान देत संजीवनीने तिसरे स्थान मिळविले असून, आॅलिम्पिकपटू ललिता बाबर आणि एशियन स्पर्धेचा मोठा अनुभव असलेल्या स्वाती गाढवे यांच्यापेक्षा उत्कृष्ट वेळेची नोंद करीत संजीवनीने चीनमध्ये भारताचा झेंडा रोवला. संजीवनीच्या या कामगिरीमुळे भारतीय संघानेदेखील कांस्य पदक पटकाविले.
चीन येथील आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी महिलांच्या भारतीय संघात चार महिलांची निवड करण्यात आली होती. संजीवनी जाधवसह जुम्मा खातून, ललिता बाबर आणि स्वाती गाढवे यांचा त्यात समावेश होता. महिलांच्या ८ किलोमीटरमध्ये संजीवनी जाधव हिने २८:१९ मिनिटांची वेळ नोंदवत करीत ब्रॉँझ पदक मिळविले. स्पर्धेत चीनची ली डेन हिने २८:०३ वेळेची नोंद करीत सुवर्ण तर जपानच्या अबे युकारी हिने २८:०६ मिनिटांची वेळ नोंदवून दुसरा क्रमांक मिळविला.
कॉमनवेल्थ स्पर्धेत पात्रता मिळवू न शकल्याने काहीसे नैराश्य आलेले असतानाही त्यावर मात करीत संजीवनीने १४व्या एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना पदकाला गवसणी घातली. महिलांच्या आठ किलोमीटरमध्ये संजीवनीने वैयक्तिक ब्रॉँझ पदक तर भारतीय संघालादेखील कांस्य पदक मिळवून दिले. संजीवनीच्या या कामगिरीमुळे तिच्या कारकिर्दीत आणखी एका आंतराष्ट्रीय पदकाची भर पडली आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे रिओ आॅलिम्पिकचा अनुभव पाठीशी असणारी ललिता बाबर आणि पाच वेळेला एशियन स्पर्धेत सहभागी होण्याचा मोठा अनुभव असणाऱ्या स्वाती गाढवे यांच्यापेक्षा संजीवनीने चांगली कामगिरी केली. स्वाती अकराव्या स्थानावर राहिली तर ललिताला पंधराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्वातीला हीच स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३०:१८ इतका वेळ लागला तर संजीवनीने तिच्यापेक्षा दोन मिनिटे आधी ही स्पर्धा पूर्ण केली. स्वातीला पाचवेळा एशियन स्पर्धेचा अनुभव असतानाही संजीवनीने केलेली कामगिरी कौतुकास्पद मानली जात आहे.
गेल्या वर्षभर अॅथलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारी संजीवनी कॉमनवेल्थची तयारी करीत असताना तिला पात्रता मिळविण्यात यश आले नसतानाही तिने क्रॉसकंट्रीमध्ये पदक मिळवून आगामी जुलैमध्ये होणाऱ्या एशियन चॅम्पियनसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.