नाशिक: उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत भाजपसह शिंदेसेनेवर ठाकरे शैलीत टीकास्त्र सोडल्यानंतर आजच्या (दि.१०) सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उद्याच्या (दि.११) सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा महिला मतदारांना साद घालतील. तसेच शहरातील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाबाबत सभेत पुन्हा आश्वासन देतील, तर मुख्यमंत्री फडणवीस कुंभमेळ्यातील कामे, स्वबळावर लढवलेली निवडणूक अन् विकासाच्या मुद्रांवर भाष्य करतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे. शेवटच्या तीन दिवसांत या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होत असल्याने राजकीय आखाड्यात रंगत अधिकच वाढली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन उपस्थित असतील तर शिंदे यांच्या सभेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, राष्ट्रवादीचे (अजित पतार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील संबोधित करतील. लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तसेच कुंभमेळ्यातील कामांच्या शुभारंभप्रसंगी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे नाशिकमध्ये एकत्रित आले होते, मात्र मनपा निवडणुकीत दोघेही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याने दोघांच्या सभा एक दिवसानंतर होत आहे. अनेक प्रयत्नानंतर युती फिस्कटली होती.
भाजपने १२१ उमेदवार उभे करून १०० प्लसचा दिलेला नारा त्यामुळे शिंदेसेनेने देखील सत्तेसाठी आपली व्यूहरचना केली आहे. शिंदे सेनेने शहरात २२ उमेदवार दिले असून भाजपासोबत सरळ लढत होत असल्याने निवडणुकीत रंगत गढली आहे. पक्षांच्या नेत्यांच्या सभा कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी बळ देणाऱ्या ठरतील, असा विश्वास स्थानिक नेत्यांना आहे. शिंदे यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस अगोदर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकचा दौरा करून उद्योजकांची भेट घेतली होती. तर त्याच्या दोन दिवस अगोदर खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहरात मोटर रॅलीत सहभाग घेतला होता. सलग तीन दिवस शिंदे सेनेच्या नेत्यांच्या नाशिक दौऱ्याने भाजपासमोर देखील आव्हान ठाकले आहे
शनिवार (दि.१०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सभास्थळ : अनंत कान्हेरे मैदान
वेळ : सायंकाळी ६ वाजता
ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर देणार
नगरविकास खाते माझ्याकडेच असल्याचे सांगून विकासाची ग्वाही देणार
लोकसभा, विधानसभा अन् पालिका निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश सांगून याच स्ट्राइक रेटसाठी साद घालणार
मी मुख्यमंत्री असतानाच लाडकी बहीण योजना आणल्याचा दावा करणार
तपोवनातील वृक्षतोडीवर सौम्य भूमिका मांडू शकतात
रविवार (दि.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सभास्थळ : गोदाघाट
वेळ : सायंकाळी ६ वाजता
स्वबळावर निवडणुकीविषयी भूमिका मांडणार
मुंबईबाहेरील व्यक्ती संबोधल्याने राज ठाकरेंना पुन्हा उत्तर देऊ शकतात
कुंभमेळा यशस्वीतेसाठीची कामे सांगून काही नवीन घोषणा शक्य
राज्यात केलेली विविध विकासकामे सांगून मतदारांना सादर घालणार
तपोवनातील वृक्षतोडीला उघडपणे समर्थन न करता बचावात्मक भूमिका घेत प्रशासनाने घेतलेला निर्णय कसा योग्य हे समजून सांगू शकतात.
मित्रपक्षांवर टीका टाळणार; ठाकरे बंधूच लक्ष्य, विकासावर बोलणार
नाशिकसह अनेक ठिकाणी भाजप व शिंदेसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीवर तसेच एकमेकांच्या पक्षांवर टीका करणे थेटपणे टाळत असल्याचे दिसून येते. त्याऐवजी ते ठाकरे बंधूंची झालेली युती यावर भाष्य करीत असून, तोच थागा ते नाशिकमधील सभेतही पकडतील, असा अंदाज आहे.
कारण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारच्या नाशिक दौऱ्यात आम्ही मित्रपक्षांवर टीका करणार नाही, तर युती नसलेल्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असल्याचे संकेत दिले होते. नाशिकमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र येऊन भाजपविरुद्ध मैदानात उतरले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात सत्तेतील मित्रपक्षांवर टीका न करता ठाकरेंवरील टीका तसेच इतर स्वतंत्र मुद्द्यांवर बोलतील, असादेखील अंदाज राजकीय पटलावर बांधला जात आहे.
Web Summary : Following criticism from the Thackeray brothers, Shinde and Fadnavis will address Nashik, emphasizing development projects and responding to their remarks. Focus will be on women voters and infrastructure.
Web Summary : ठाकरे बंधुओं की आलोचना के बाद, शिंदे और फडणवीस नासिक को संबोधित करेंगे, विकास परियोजनाओं पर जोर देंगे और उनकी टिप्पणियों का जवाब देंगे। महिला मतदाताओं और बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित किया जाएगा।