नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
By अझहर शेख | Updated: May 11, 2025 16:23 IST2025-05-11T16:22:47+5:302025-05-11T16:23:37+5:30
रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.

नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
नाशिक : शहरात रविवारी (दि.११) दुपारी दाेन वाजेपासून साडे तीन वाजेपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला. विजांच्या कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसाने शहरात ठिकठिकाणी तलाव साचले. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.
शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून पुन्हा येत्या सोमवारपर्यंत (दि. १२) अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गडगडाटी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला असून शनिवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाने झोडपले तर रविवारी शहरात जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामान व उकाडा वातावरणात जाणवत होता. यामुळे दुपारी पाऊस जोरदार हजेरी लावणार हे निश्चित झाले होते.
रविवारची सुटी असतानाही नागरिक बाजारपेठांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले नाही. दुपारी दोन वाजेपासून काही उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली तर शहराच्या मध्यवर्ती भागात तीन वाजेपासून जोरदार पाऊस वीजांच्या कडकडाटासह सुरू झाला. सुमारे ४०मिनिटे चाललेल्या या पावसाने तारांबळ उडवून दिली. दरम्यान, शहरातील द्वारका, उंटवाडी सिग्नल, त्र्यंबकनाका, सारडासर्कल आदी भागात वाहतूक कोंडीदेखील पहावयास मिळाली. दुपारी चार वाजेपासून शहरात कडक ऊन पडले आहे हे विशेष..!