Nashik Crime News: जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी क्रिश शिंदे हा मंगळवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारातून पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाला. त्यामुळे भद्रकाली पोलिसांची भंबेरी उडाली असून रात्री उशिरापर्यंत त्याचा पोलिस शोध घेत होते; मात्र, त्यांना यश आले नाही. त्याला पुन्हा ताब्यात घेण्याचेमोठे आव्हान भद्रकाली पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन रोडवरील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे (४०, रा. अनुसयानगर) यांच्यावर कोयत्याने तिघांनी प्राणघातक हल्ला केला होता.
वाचा >>धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
या हल्ल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या गुन्ह्यात जुने नाशिकमधील कथडा भागात असलेल्या ५४ क्वॉर्टर वसाहतीमधून संशयित क्रिश शिंदे (२०) यास ताब्यात घेत अटक केली होती.
त्याला मंगळवारी (२९ एप्रिल) भद्रकाली पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसाच्या हाताला झटका दिला अन् झाला फरार
भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक न्यायालयातून त्याला पोलीस ठाण्यात शासकीय वाहनातून घेऊन आले. यावेळी वाहनातून उतरल्यानंतर शिंदे याने पोलिसांच्या हाताला हिसका देत थेट बाहेर पळ काढला.
याचवेळी पोलीस ठाण्याच्याबाहेर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या एका इसमाच्या पाठीमागे बसून तो परिसरातून फरार झाला. त्याला पकडण्याचा प्रयत्न एका कर्मचाऱ्याने केला मात्र, धावताना तोल जाऊन कर्मचारी खाली पडला.
याप्रकरणी कायदेशीर रखवालीतून पसार झाल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सगळी घटना सीसीटीव्हीत कैद
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित शिंदे कैद झाला आहे. तसेच त्याला पळविण्यामध्ये मदत करणाऱ्या अज्ञात दुचाकीचालकदेखील सीसीटीव्हीत फुटेजमध्ये दिसत असून हे दोघेही एका मोपेड दुचाकीने फरार झाले आहेत.
गुन्हे शाखेकडूनही आरोपीचा शोध
संशयित शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याचे समजताच गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकानेही त्याचा माग काढण्यास सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत जुने नाशिक, काठेगल्ली, तपोवन, टाकळीरोड, जेलरोड आदी भागात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.