Maharashtra Local Body Election : नगरपरिषद निवडणुकीचे निमित्त साधत येवला या आपल्या बालेकिल्ल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धवसेनेला डॅमेज करतानाच विरोधकांची ताकद क्षीण करण्याची मोठी खेळी खेळली आहे. सध्या प्रकृतीच्या कारणावरून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भुजबळ यांनी उद्धवसेनेचे भरवशाचे खेळाडू संभाजी पवार यांना त्यांचे काका व माजी आमदार मारोतीराव पवार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गळाला लावत स्व-अस्तित्व बळकट करतानाच पक्षालाही अधिक तरतरी आणली आहे.
येवला मतदारसंघात तीन वेळा आमदार निवडून आणणाऱ्या उद्धवसेनेची केविलवाणी स्थिती बनली असून, नगराध्यक्षपदासाठीही त्यांना उमेदवार देता येऊ शकलेला नाही. दुसरीकडे भुजबळ यांनी भाजपला सोबत घेतल्याने एकाकी पडलेल्या शिंदेसेनेने राष्ट्रवादी शरद पवार गटाशी हातमिळवणी करत आपल्या अस्तित्वासाठी धडपड चालविली आहे.
समीर भुजबळांनी सूत्रे घेतली हाती
एकीकडे नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला असताना मंत्री छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाले; परंतु माजी खासदार समीर भुजबळ आणि विधान परिषदेचे सदस्य पंकज भुजबळ यांनी त्यांच्या अनुपस्थितीत नगरपरिषद निवडणुकीची सूत्रे हाती घेतली.
येवला शहरात भाजपसह रा. स्व. संघाचा मोठा प्रभाव असल्याने भुजबळ यांनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला सोबत घेण्याची खेळी केली आणि शिंदेसेनेला दूर ठेवतानाच बऱ्यापैकी प्रभात असलेल्या उद्धवसेनेचेही पंख कापण्यास सुरुवात केली. त्याची परिणिती माजी आमदार मारोतराव पवार व त्यांचे पुतणे आणि पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेशाने झाली आहे.
शिवसेनेचा गड, आता भुजबळांचा बालेकिल्ला
येवला मतदारसंघात दोन वेळा शिवसेनेचे कल्याणराव पाटील हे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. २००४ नंतर मात्र येवला हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला झालेला आहे. २०१४ मध्ये संभाजी पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करत भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तर २०१९ मध्येही शिवसेनेने भुजबळांविरुद्ध त्यांच्या पाठीशी बळ उभे केले होते. या दोन्ही निवडणुकीत संभाजी पवार यांनी चांगली मते घेतली होती.
येवल्यात नरेंद्र व किशोर दराडे या बंधूसह संभाजी पवार यांनी शिवसेनेची इभ्रत राखलेली होती; परंतु गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घडामोडीनंतर दराडे बंधूंनी उद्धवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला तर आता संभाजी पवार यांनी दूरदृष्टी ठेवत भुजबळांसोबत जाणे पसंत केले.
संभाजी पवार यांच्या सोबत दोन वेळा आमदार राहिलेले त्यांचे काका मारोतराव पवार यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वीच माजी आमदार कल्याणराव पाटील हेदेखील भुजबळांसोबत आले. परिणामी, उद्धवसेनेची अवस्था केविलवाणी बनली असून, नेतृत्वालायक नेता शिल्लक नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मशाल पेटते की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अद्वय हिरेंच्या माध्यमातून भुसेंवर निशाणा
मालेगावमध्ये भाजपने उद्धवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना पक्षात घेत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. अद्वय यांचे बंधू अपूर्व यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपत प्रवेश केला होता. आता अद्वय यांना प्रवेश देत भाजपने शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
याचबरोबर उद्धवसेनेची ताकदही क्षीण करण्याची खेळी खेळली आहे. उद्धवसेनेने भुसेंविरोधात उमेदवारी देतानाच संकट काळात माजी खासदार संजय राऊत यांनी अद्वय यांची पाठराखण केली होती.
मात्र, भुसेंशी संघर्ष करताना सत्तेशिवाय उपयोग नाही, हे अद्वय यांनी हेरल्याने त्यांचा पुनश्च भाजप प्रवेश झाला आहे. अय यांनी २०१४ मध्ये नांदगावमधून भाजपकडून उमेदवारी केली होती.
Web Summary : Chhagan Bhujbal strategically weakened Uddhav Sena in Yeola, leveraging Ajit Pawar's NCP. He also sidelined Shinde Sena by aligning with BJP. Uddhav Sena struggles, while Bhujbal consolidates power, impacting local elections.
Web Summary : छगन भुजबल ने येवला में अजित पवार की राकांपा का लाभ उठाकर उद्धव सेना को कमजोर किया। उन्होंने भाजपा के साथ गठबंधन करके शिंदे सेना को भी अलग कर दिया। उद्धव सेना संघर्ष कर रही है, भुजबल शक्ति मजबूत कर रहे हैं, जिसका असर स्थानीय चुनावों पर पड़ रहा है।