Nashik Crime News: पोलीस चेक नाक्यावर एक कार थांबलीच नाही. कारचालक सुसाट पुढे निघून गेला. त्यामुळे पोलीस सतर्क झाले. त्यांनी कारचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पण, कारचालक आणखीनच वेगात निघाला. नाशिक शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान हा नाट्यमय पाठलाग सुरू होता. अखेर तासाभराने पोलिसांना त्याला पकडण्यात यश. पोलिसांनी गाडीत तपासली तेव्हा त्यात तब्बल २८ किलो गांजा सापडला.
या सगळ्या फिल्मी स्टाईल पाठलागाचा पोलिसांनी व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात लाल रंगाची कार पुढे आहे आणि पोलिसांच्या गाड्यांना चकमा देत कारचालक सुसाट पुढे निघून जातो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाची कार (एमएच २) धुळ्यावरून नवी मुंबईला जात होती. अडगाव थांबा आणि चेक पॉईंटजवळ कारचालकाने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांनी सांगितले की, चेकपाईंटला न थांबता कारचालक निघून गेल्याने बेकायदेशीर शस्त्रे, अंमली पदार्थ, स्फोटके किंवा अशाच प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून, कंट्रोल रूमला काही सेकंदांत सतर्क केले गेले.
नाशिक शहर पोलिसांच्या ८ सीआर मोबाईल्सनी तातडीने कारवाई करत शहरभरात नाट्यमय पाठलाग सुरू केला. संशयित चालकाने पकड टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांवरून वाहन चालवले, परंतु आमच्या पथकांनी कुशल रणनीती वापरून इतरांना कोणतीही इजा न होता त्याला यशस्वीपणे ताब्यात घेतले.
पाठलागात सहभागी संपूर्ण पथकाचा नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी सत्कार केला. तत्काळ पाठलाग सुरू करणाऱ्या सतर्क कर्मचाऱ्यांपैकी भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक केले.
असा केला पाठलाग
चेकपाईंटवरून फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. नाशिक शहराकडे तो निघाला. द्वारका यू टर्न, अमरधाम यू टर्न, केके वाघ कॉलेज त्यानंतर चक्रधर स्वामी मंदिर असा हा पाठलाग सुरू होता. त्यानंतर त्याला पकडण्यात यश आले.
कारमध्ये सापडला २८ किलो गांजा
कार थांबवल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये काय संशयास्पद वस्तू आहेत का, याचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली. कारच्या ट्रंकमध्ये तब्बल २८ किलो गांजा सापडला. पोलिसांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक होत आहे.