विभागातील लसीकरणात नाशिक जिल्हा व्दितीय स्थानी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:48+5:302021-02-05T05:45:48+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणात शनिवारपर्यंत १२,०५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ३६१७८ ...

विभागातील लसीकरणात नाशिक जिल्हा व्दितीय स्थानी !
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणात शनिवारपर्यंत १२,०५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ३६१७८ उद्दिष्टाच्या ३३.७१ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यंत्रणेला यश आले आहे. विभागातील धुळे जिल्ह्याच्या तुलनेत ही टक्केवारी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी संख्येच्या तुलनेत ही आकडेवाारी व्दितीय स्थानावरील असून टक्केवारी समाधानकारक आहे.
लसीकरणामध्ये प्रारंभीच्या टप्प्यात नाशिक जिल्हा काहीसा पिछाडीवर पडला होता. पहिल्या दिवशी तर केवळ ५७ टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होऊ शकले. मात्र, राज्यात देण्यात येत असलेल्या कोरोना लसींच्या डोसमध्ये कुठेही फार मोठे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचीदेखील वेळ आली नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येदेखील कोणत्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे लक्षात आल्यानंतर लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला.
लसीकरणातील वास्तव
१ लहान बाळांनादेखील कोणतीही लस दिली तर थोडीशी रडरड करणे, ताप येणे यासारखे प्रकार घडतात. मग ही तर काेरोनासारख्या आजारावरील लस असल्याने त्यामुळे काहींना थोडेसे डोके जड होणे, हात दुखणे असे प्रकार होऊ लागले. तरी ती चिंतेची बाब नसून ती लस योग्य परिणाम करीत असल्याचे सिद्ध झाल्याने कर्मचारी स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येऊ लागले.
२ जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात १३ रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभीच्या टप्प्यात काहींनी प्रकृतीचे कारण दिले, त्यात कुणी इतर आजाराचे कारण दिले. काही कर्मचाऱ्यांनी ॲलर्जीचे कारण सांगून नकार दिला. तर काहींनी पुढील टप्प्यात लस घेणार असल्याचे सांगून पहिल्या दिवशी लस घेण्यास नकार दिला. जिल्ह्यातील लसीकरणामध्ये प्रत्येक केंद्रावर काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला.
३ त्यानंतर लस घेण्यात धोका नसल्याचे लक्षात आल्याने आता कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात हळूहळू वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात प्रारंभी कमी असलेल्या लसीकरणाच्या प्रक्रियेत हळूहळू सकारात्मक वाढ होत असल्यानेच नाशिक जिल्ह्याची टक्केवारी ३३.७१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
४ पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून देण्यात येणार आहे. त्यामुळे तो दुसरा डोस पूर्ण व्हायला जवळपास एक महिना म्हणजे १४ मार्चपर्यंतचा काळ जाणार आहे. त्यामुळे त्यानंतरच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पुढील बॅचला पहिला डोस दिला जाणार आहे. त्यामुळे मार्चच्या मध्यापर्यंतचे डोस सध्या आरोग्य विभागाकडे सज्ज आहेत. त्यानंतरच पुढील बॅचसाठी लस लागणार असून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इन्फो
लसीकरणात महिलांचे वाढते प्रमाण
लसीकरणात प्रारंभी आरोग्य क्षेत्रातील सर्वच वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, पहिल्या दिवशी गर्भवती माता तसेच स्तनदा मातांनी नकार दिल्यानंतर नियमावलीत बदल करून त्यांना यादीतूनच वगळण्यात आले. त्यानंतर मात्र, लसीकरणातील महिलांचे प्रमाण वाढू लागले असून आता ते पुरुषांच्या समकक्ष आले आहे.
विभागातील जिल्हानिहाय लसीकरण
धुळे ५०.७३
नाशिक ३३.७१
नंदुरबार ३२.२७
नगर २९.८६
जळगाव २७.६९
( विभागात १ लाख ९ हजार ७९ लक्ष्यांकापैकी ३२३५६ अर्थात सरासरी ३२.७२ टक्के लसीकरण झाले आहे.)