Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:57 IST2025-11-22T06:55:34+5:302025-11-22T06:57:06+5:30
Malegaon Minor Rape and Murder Case: मालेगाव प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वारे तोडले.

Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
नाशिकच्या मालेगाव तालुक्यात बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. मोर्चानंतर बिथरलेल्या जमावाने न्यायालय आवाराचे प्रवेशद्वार तोडत आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.संतप्त जमावाने मालेगावातील न्यायालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील काचेचा दरवाजा फोडण्याचाही प्रयत्न केला.
गुन्हेगाराला फाशी देत चिमुरडीला न्याय द्या!
मालेगाव तालुक्यातील एका गावातील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करत खून केल्याप्रकरणी जिल्ह्यात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सर्वपक्षीयांच्या वतीने मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती. व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध नोंदविला. या घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशी द्या, पीडित बालिकेला न्याय द्या, महिलांना संरक्षण द्या, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
नाशिकमध्येही आक्रोश
चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करा; कायद्यात बसत नसेल तर त्याला नागरिकांच्या हवाली करा, अशी संतप्त मागणी करीत सुवर्णकार समाजासह नाशिकमधील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
महिला आयोगाकडून दखल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच, महिला आयोग जलद न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.