नाशिक शहर रेल्वे तिकीट कार्यालय त्वरीत सुरू करावे ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:40 IST2020-06-18T17:30:54+5:302020-06-18T17:40:22+5:30
नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

नाशिक शहर रेल्वे तिकीट कार्यालय त्वरीत सुरू करावे ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी
नाशिक : लॉकडाऊननंर हळुहळू नियमांमध्ये शिथिलता दिली जात असलाना प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक शहरातील तिकीट आरक्षण कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांना रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नाशिकरोडला जावे लागू नये म्हणून नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेने तिकीट आरक्षण कार्यालय सुरु केलेले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे आरक्षण कार्यालय २३ मार्च २०२० पासून बंद आहे. परंतु आता रेल्वेने २०० गाड्याही सुरु केल्या असून त्या गाड्यांचे तिकीट आरक्षण तसेच रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचा परतावा देण्याचे काम सुरु झाले आहे. नाशिकच्या प्रवाशांना याकरीता १२ किलोमीटर दूर असलेल्या नाशिकरोड स्टेशनवर त्यासाठी जावे लागत आहे. मुळातच वेळेवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची गर्दी रेल्वे स्टेशनवर असते. नाशिक शहर तिकीट कार्यालयातून दररोज जवळपास एक हजार तिकीट विक्री होते व अंदाजे २५ कोटींचा महसूल रेल्वेला प्राप्त होतो. त्यामुळे नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.