राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 07:24 PM2024-02-04T19:24:58+5:302024-02-04T19:25:30+5:30

ओबीसी आंदोलन करताना दोन महिन्यांपुर्वीच राजीनामा दिला होता.

Must work until acceptance of resignation; Chagan Bhujbal again took the matter to the court of the Shinde group | राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

नाशिक : राजीनामा दिल्यानंतरही मी खुर्चीला चिटकून बसलो आहे असा आरोप करणाऱ्यांनी माझ्या राजीनाम्याची तारीख पहावी. राजीनामा मंजूर होस्तर माझ्यावर असलेली जबाबदारी मला पार पाडावीच लागेल. राजीनामा मंजूर झाल्यानंतर मी ते कामही बंद करेल. माझ्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे माझा राजीनामा स्वीकृत करण्याची विनंती करावी; कदाचीत ते मान्य करतील असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

नाशिक येथे आयोजीत कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले १६ नोव्हेंबर रोजी अंबड सभेला जाण्यापूर्वी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजित पवार यांच्या कार्यालयात दिला. सभेला जातांना वाच्यता करू नका असा निरोप मला देण्यात आला. त्यामुळे मी सभेत त्याची वाच्यता केली नाही. नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतले. अजित दादा म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. यावर तुमचे काम, ओबीसी मत मांडायला आमचा विरोध नाही, आपण शांततेत ओबीसींचे काम करायला पाहिजे, राजीनाम्याची वाच्यता करू नका असे तिघांनी मला सांगितल्याने अडीच महिने मी त्याची वाच्यता केली नाही, असे भुजबळ म्हणाले.

मात्र आता कंबरेत लाथ घाला आणि बाहेर काढा असे उद्गार एकाने काढल्यानंतर मला ते सांगणे भाग पडले. मी मंत्रिपदाला चिटकून बसलेलो नाही. माझा राजीनामा कोणाला नाटक वाटू दे, कोणी काहीही बोलू दे.. आजही मी सांगतो राजीनामा दिलेला आहे, संजय गायकवाड, राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावे, कदाचित त्यांचे ऐकले जाईल असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत मला काम करावे लागेल, फाईलवर स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आहेत, असेही भुजबळ म्हणाले.

अर्थसंकल्पात आरक्षणाबाबत तरतुदीची जरांगे यांच्या मागणीबाबत विचारले असता राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून ते घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. एखादी गोष्ट पटत नसेल तर त्यावर बोलावे लागते. त्यामुळेच मी बोलतो असेही भुजबळ म्हणाले.

Web Title: Must work until acceptance of resignation; Chagan Bhujbal again took the matter to the court of the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.