मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:05 IST2018-02-11T23:00:15+5:302018-02-11T23:05:25+5:30
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार
नाशिक : मध्य महाराष्ट्रात सोमवारी (दि.११) मुंबई वेधशाळेकडून गारपिटीसह वादळी वारा अन् पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरात ढग दाटून येत असून, रविवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ नाशिककरांनी अनुभवला. रविवारी पहाटे थंडीचा कडाका वाढला होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडी जाणवत होती. तसेच संध्याकाळी सहा वाजेपासून हवेत प्रचंड गारठा निर्माण झाल्याचे जाणवत होते. एकूणच हवामान बदलल्याने शेती व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. ढगाळ हवामानासह वा-याचा वेग शहरात सोमवारी कायम राहण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तविली गेली आहे. शनिवारी सकाळपासून वावटळ उठत होती. रविवारीदेखील वा-याचा वेग दुपारनंतर वाढला होता. संध्याकाळपासून वातावरण थंड झाले. मध्य महाराष्ट्रात सोमवारी गारपीट, वादळी वा-यासह पाऊस होण्याची शक्यता असून, मराठवाडा परिसराला हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी शहराच्या किमान तपमानाचा पारा १२.३ अंशांवर तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले. शनिवारच्या तुलनेत तपमानात काहीशी वाढ झाली असली तरी संध्याकाळपासून वातावरण थंड झाले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी किमान तपमान घसरण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवारी कमाल तपमान थेट २८ अंशांपर्यंत वाढले व कि मान तपमान ११.७ अंशांपर्यंत घसरले होते. शुक्रवारी तपमानात कमालीचा बदल झाला होता. अचानकपणे वाढलेले कमाल-किमान तपमान घसरल्याने थंडीची तीव्रताही जाणवली. शुक्रवारी किमान तपमानाचा पारा पंधरा अंशांवरून ९.२ अंशांवर घसरला होता.