मनपात मलाईदार खात्यासाठी हालचाली, कोणाची लागणार वर्णी?

By Suyog.joshi | Published: October 19, 2023 01:40 PM2023-10-19T13:40:12+5:302023-10-19T13:40:19+5:30

पगार यांच्याकडे नगररचनाचा पदभार सोपविण्याची आर्डर गुरूवारी (दि. १९) प्रशासन उपायुक्त कार्यालयाकडून काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Movements for the municipality's best department | मनपात मलाईदार खात्यासाठी हालचाली, कोणाची लागणार वर्णी?

मनपात मलाईदार खात्यासाठी हालचाली, कोणाची लागणार वर्णी?

नाशिक : महापालिकेत सध्या पदोन्नतीची जोरदार चर्चा सुरू असून कोण कोणत्या विभागात जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. परसेवेतून परतलेले प्रशांत पगार यांच्याकडे महापालिकेतील मलाईदार विभाग असलेल्या नगररचना विभागाचा पदभार सोपवण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे सिडको व सातपूर विभाग पाणी विभागाचा पदभार सोपवला असला तरी ते रजेवर आहेत. पगार यांच्याकडे नगररचनाचा पदभार सोपविण्याची आर्डर गुरूवारी (दि. १९) प्रशासन उपायुक्त कार्यालयाकडून काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

उदय धर्माधिकारी निवृत्त झाल्यानंतर पाणी पुरवठा अधीक्षक अभियंतापदाचा प्रभार सेवा ज्येष्ठतेच्या निकषानुसार नगररचनाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे महापालिकेतील मलईदार पद असलेल्या नगररचना कार्यकारी अभियंतापदासाठी इच्छुकांनी जोरदार लाॅबिंग सुरु केली आहे. त्यातही या अगोदर मनपा सेवेत असलेले व पिंपरीचिंचवड येथे परसेवेत गेलेले प्रशांत पगार हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करुन मनपाच्या सेवेत रुजू झाले आहेत. नगररचना विभागावरच डोळा ठेवून त्यांनी मनपाच्या मूळ सेवेत परतल्याचा टाईमिंग साधला अशी चर्चा आहे.

निर्णयाकडे लक्ष
मनपाच्या सेवेत परतल्यावर त्यांच्याकडे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता म्हणून सिडको व सातपूर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारी स्विकारली असली तरी ते सध्या रजेवर आहेत. तेथूनच ते नगररचना कार्यकारी अभियंतापदासाठी जोरदार लाॅबिंग सुरु केली आहे. मलईदार खाते पदरात पाडण्यासाठी जोरदार आर्थिक घोडेबाजार होत असल्याची चर्चा सुरु आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांची ऑर्डर निघण्याची चिन्हे असून आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

आयुक्तांच्या बदलीच्या वावड्या
महापालिकेत सध्या आयुक्त डाॅ. अशोक करंजकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा होत आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री या आयुक्त म्हणून मनपात येतील अशी चर्चा रंगली आहे. या अगोदर मनपात आयुक्तपद रिक्त असताना आयुक्तपदाच्या शर्यतीत खत्री यांचे नाव देखील चर्चेत होते. त्या भाजप नेते गिरीश महाजन यांच्या त्या मर्जीतील समजल्या जातात. परंतु डाॅ.करंजकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन जेमतेम चार महिने झाले असताना बदलीच्या चर्चेने सर्वजण बुचकळ्यात पडले आहेत.
 

Web Title: Movements for the municipality's best department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.