MNS takes revenge of Shiv Sena | मनसेने घेतला शिवसेनेचा बदला

मनसेने घेतला शिवसेनेचा बदला

नाशिक : महापालिकेत अवघे पाच नगरसेवक असूनही किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे दिसत होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. राज ठाकरे यांनी मध्यरात्री पाठविलेल्या नेत्यांनी भाजपला पाठिंबाच नव्हे तर थेट उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिलेच त्यानुसार पक्षादेशदेखील बजावण्यात आले. या घटनेनंतर वातावरण फिरू लागले. मनसेने दिलेल्या पाठिंब्याविषयी उलट सुलट चर्चा होत असली तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेने केलल्या पळवापळवीचा बदला यानिमित्ताने घेतल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिकेत मनसेच्या पाच आणि एक अपक्ष असा सहा नगरसेवकांचा गट होता. भाजपसमोर बहुमताचा प्रश्न उद््भवल्यानंतर कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसे या पक्षांना महत्त्व आले होते. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्टÑवादीला आपल्याबरोबर असल्याचा दावा केला होता. मात्र मनसेच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली जात होती. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सर्व नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांच्यावरच निर्णय सोपवला होता. मात्र, मनसे भाजपबरोबरच जाईल अशी अटकळ बांधली जात होती. त्यादृष्टीने मनसेची पावले पडत होती. मध्यरात्री मनसेचे संदीप देशपांडे आणि अभिजीत पानसे यांनी घोटी येथे सहलीवर असलेल्या मनसे नगरसेवकांची भेट घेतली आणि मनसेला मतदान करण्याचा निर्णय स्पष्ट केला.
या स्पष्टतेनंतर रात्रीच गटनेता नंदिनी बोडके यांच्या स्वाक्षरीचे व्हीप करून ते सर्व नगरसेवकांना बजावण्यात आले. पक्षाच्या नगरसेविका अ‍ॅड. वैशाली भोसले या रविवारपेठेतील त्यांच्या घरी उपलब्ध नसल्याने पक्षादेश त्यांच्या घरावर चिटकवण्यात आला आणि मोबाइलवर त्यांना माहिती देण्यात आली. मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर मात्र शिवसेनेचा ताण वाढला. दरम्यान, कॉँग्रेसनेदेखील हटवादी भूमिका घेतल्यानेदेखील अडचणी निर्माण झाल्या. तथापि, मनसेची भूमिका निर्णायक ठरली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवक शिवसेनेने पळविले होते. त्यामुळे राज यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला नसल्याचे सांगण्यात आले.
उघड नाराजी
महापालिकेत पक्षाने घेतलेल्या भूमिकेविषयी मात्र पक्षाचे माजी आमदार नितीन भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली आहे. मोदीमुक्त देशाची घोषणा करताना मोदीयुक्त मनसे कधी झाली हे कळलेच नाही, आपल्या घरावर पक्षादेश लावल्यानंतर हा प्रकार कळला, असे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांची नाराजी उघड झाली आहे.
मनसेने भाजपला मतदान करण्याचा निर्णय का घेतला हे कळले नाही. पक्षात विचारण्याची सोय नाही. त्यामुळे भविष्यात काय करायचे त्याबाबत कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना विचारून पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येईल.
- नितीन भोसले,
माजी आमदार, मनसे

Web Title:  MNS takes revenge of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.