नाशिकमध्ये मनसेने महापौरांना दिले च्यवनप्राश भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 18:01 IST2020-07-14T17:58:02+5:302020-07-14T18:01:00+5:30
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तारूढ भाजपला मात्र नियंत्रण आणता येत नाही, असा ठपका ठेवत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट देण्यात आले आणि फिट राहा आणि शहरात भेटी देऊन कोरोना नियंत्रणात आणा अशी मागणी करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये मनसेने महापौरांना दिले च्यवनप्राश भेट!
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तारूढ भाजपला मात्र नियंत्रण आणता येत नाही, असा ठपका ठेवत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट देण्यात आले आणि फिट राहा आणि शहरात भेटी देऊन कोरोना नियंत्रणात आणा अशी मागणी करण्यात आली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संदीप भंवर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१४) रामायण या महापौर निवासस्थानी भेट देऊन महापौर कुलकर्णी यांना च्यवनप्राश देण्यात आले. नाशिक शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या सुरूवातीला अत्यंत मर्यादीत होती, मात्र गेल्या दीड महिन्यात ही संख्या अत्यंत झपाट्याने वाढली असून चार हजाराच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचा कहर देखील अनुभवण्यास येत असून केवळ नाशिक शहरातच पावणे दोनशे मृत्यू झाला आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता असून कोरोनावर नियंत्रण आणण्यात या पक्षाला अपयश आले आहे. महापौर हे कोणत्याही कोरोना सेंटर किंवा अन्यत्र कोठेही भेट देत नाहीत आणि बाहेर देखील पडत नाही. त्यामुळे नाशिककरांना आधार मिळणार कसा असा प्रश्न करीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महापौर च्यवनप्राश घ्या, तंदुरूस्त व्हा आणि शहरात फिरून कोरोना आटोक्यात आणा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात कौशल पाटील, सौरभ सोनवणे, जावेद शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने आता राजकारण सुरू झाले असून विरोधांनी भाजपाला लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. कालच शिवसेनेचे नेते आणि महापालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी महापौर सतीश कुलकर्णी निद्रीस्त असल्याचा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याता मनसेच्या आंदोलनाची भर पडली आहे.