पारा ७.६ : राज्यात नाशकात नीचांकी तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:21 IST2019-01-07T21:19:33+5:302019-01-07T21:21:07+5:30

शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.

Mercury 7.6: The lowest temperature in the state | पारा ७.६ : राज्यात नाशकात नीचांकी तापमान

पारा ७.६ : राज्यात नाशकात नीचांकी तापमान

ठळक मुद्देमागील आठवड्यात पारा थेट ५.१ अंशांपर्यंत यावर्षी नाशिककर थंडीने चांगलेच गारठले.

नाशिक : शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर-मध्य महराष्टÑात पुन्हा शीतलहर आली आहे. हवामान खात्याकडून दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा शनिवारी देण्यात आला होता. काश्मीर खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तेथील तापमानाचा पारा उणे ४ ते उणे ११ अंशांपर्यंत घसरला आहे. गुलबर्गमध्ये उणे ११, पहेलगाममध्ये उणे १३.६ तर श्रीनगरमध्ये उणे चार अंशांपर्यंत किमान तापमान सोमवारी नोंदविले गेले. बर्फ वृष्टीचा थेट परिणाम पुन्हा उत्तर महाराष्टÑावर होऊ लागला असून, नाशिक गारठण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये ७.६ अंश इतके नोंदविले गेले तर अहमदनगरमध्ये ८.४, पुणे ९.२, मालेगाव, जळगावमध्ये ९.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. नागपूर, अमरावती, गोंदिया, उस्मानाबाद, सातारा आदी शहरांचे तापमान दहा अंशांच्या पुढे सरकल्याने थंडीपासून तेथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी नाशिककर थंडीने चांगलेच गारठले. मागील आठवड्यात पारा थेट ५.१ अंशांपर्यंत घसरल्याने नागरिक थंडीने हैराण झाले होते. थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांना आता थंडी नकोनकोशी वाटू लागली आहे. सोमवारी कमाल व किमान तापमान घसरल्याने पहाटेपासून थंडी जाणवत होती. दिवसभर प्रखर ऊन जरी शहरात पडले होते तरी थंड वाºयाचा वेग वाढल्यामुळे वातावरणात गारठा जाणवत होता. संध्याकाळी पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. त्यामुळे नागरिकांकडून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Mercury 7.6: The lowest temperature in the state