प्रसूतीपश्चात मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:12 IST2020-03-14T23:52:38+5:302020-03-15T00:12:56+5:30
मोहाडी येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपश्चात काही तासांनंतर दिंडोरीरोडवरील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी संतप्त होत उपचारासाठी हलगर्जीपणा करून जाणूनबुजून विलंब करणाऱ्या संशयित दोषी डॉक्टरला अटक करण्याच्या मागणीसाठी रुग्णालयात ठिय्या दिला.

प्रसूतीपश्चात मातेचा मृत्यू
नाशिक : मोहाडी येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपश्चात काही तासांनंतर दिंडोरीरोडवरील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी संतप्त होत उपचारासाठी हलगर्जीपणा करून जाणूनबुजून विलंब करणाऱ्या संशयित दोषी डॉक्टरला अटक करण्याच्या मागणीसाठी रुग्णालयात ठिय्या दिला.
मोहाडी येथील रहिवासी असलेल्या रितीका मदन ढेरिंगे (३०) यांना प्रसूतीसाठी शुक्रवारी (दि.१३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोकार कॉलनीतील तन्मयी रुग्णालयात दाखल केले होते. रात्री बारा वाजेच्या सुमारास ढेरिंगे यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यानंतर संबंधित डॉक्टरांनी मातेची प्रकृती स्थिर असून, बाळाला मात्र बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अन्य रुग्णालयांत दाखल करावे लागणार असल्याचे मदन ढेरिंगे यांना सांगितले. मध्यरात्री दोन वाजेनंतर रितिका यांना पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. यामुळे त्यांच्याजवळ असलेल्या त्यांच्या आई फिर्यादी अलका चंद्रभान कळमकर (४०, रा. मोहाडी) यांनी येथील परिचारिकांच्या ही बाब लक्षात आणून दिली, मात्र ‘डॉक्टरांनी उपचाराबद्दल माहिती दिली आहे व मला फोन करू नका’ असे त्यांनी सांगितल्याचे कळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पहाटे सहा वाजेच्यादरम्यान कळमकर यांनी कळकळीने विनंती करत डॉक्टरांचा मोबाइल क्रमांक प्राप्त करून घेत डॉक्टरांशी संपर्क साधला. यानंतर काही वेळेत डॉक्टर रुग्णालयात पोहोचले. त्यांनी रितिकाची तपासणी करत उपचार सुरू केले. त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास अत्यवस्थेत रितिका यांना डॉक्टरांनी दुसºया रुग्णालयात हलविले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.