पोलीस पाटीलच्या अनेक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:53 IST2019-01-14T15:52:37+5:302019-01-14T15:53:01+5:30
कळवण तालुका : महसूल खात्याकडे वारंवार पाठपुरावा

पोलीस पाटीलच्या अनेक जागा रिक्त
पिळकोस : ग्रामीण भागातील दैनंदिन घडामोडींची संपूर्ण माहिती महसूल आणि पोलीस खात्याला देणारा पोलीस पाटील हा प्रशासनातील महत्त्वाचा दुवा मानला जातो, मात्र कळवण तालुक्यातील बहुतेक गावात जुने पोलीस पाटील निवृत्त झाल्यापासून त्यांच्या जागा रिक्त असल्याने त्या भरण्यासाठी महसूल खात्याकडून अद्याप कसल्याही हालचाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कळवण तालुक्यातील बहुतेक गावांतील पोलीस पाटील हे पद कित्येक वर्षांपासून रिक्त असून कळवण तालुक्यातील पिळकोस या गावाचे पोलीस पाटीलचे पद हे दहा वर्षापासून रिक्त आहे. सदर पोलीस पाटील पदाची रिक्त जागा महसूल प्रशासनाने भरावी यासाठी ग्रामीण भागातून कित्येकदा पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून ठोस निर्णय होऊ न शकल्याने तालुक्यातील बहुतेक गावाचा कारभार हा बेभरवश्याचाच आहे. गावात पोलीस पाटील नसल्यामुळे ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला व पोलीस प्रशासनालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . पोलिस पाटलांच्या जागा रिक्त असल्यामुळे त्या -त्या गावातील अपघात, नैसर्गिक आपत्ती, गुन्हेगारी घडामोडी, नेत्यांचे दौरे, अनुचित घटना, धार्मिक कार्यक्र म, जयंती, सण-उत्सव आदी विविध घटनांची खबर देण्याचे काम बंद झाले असून त्याचा फटका त्या-त्या गावांना सहन करावा लागत आहे . तालूक्यातील सरकारी अनास्थेमुळे ही पदे भरली जात नसल्याचे बोलले जात आहे. पोलीस पाटील पद लवकरात लवकर भरली गेल्यास तंटामुक्त गाव मोहिमेलाही वेग मिळू शकतो. कळवण तालुक्यातील पोलीस पाटलांवर एक ते दोन किवा याहून अधिक गावाचा कारभार पाहावा लागत असून प्रशासनाने नवीन पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी शांताराम जाधव ,बुधा जाधव, अभिजित वाघ ,सुनील जाधव, साहेबराव आहेर, हेमंत जाधव ,सचिन वाघ ,प्रवीण जाधव ,दादाजी जाधव ,मार्कंड जाधव ,केवळ वाघ ,रामदास आहेर आदींनी केली आहे.