Manakhadkar's 'wait' for the waterfall of Palkhed water! | मनमाडकरांना पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनाची ‘प्रतीक्षा’!
मनमाडकरांना पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनाची ‘प्रतीक्षा’!

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तीव्र पाणीटंचाईमध्ये पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मुख्य जलकुंभाच्या पाइपमधून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी वरुणराजा परिसरावर रुसलेलाच राहिला. शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने यावर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागविली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या खासगी विंधनविहिरींनी केव्हाच राम म्हटले आहे.
पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत जाऊन तो कालावधी आज २३ दिवसांच्या वर जाऊन पोहोचला
आहे. सध्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने पुढील उपाययोजना
न केल्यास पाण्यासाठी हतबल होण्याची वेळ मनमाडकरांवर ओढावणार आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनसुद्धा गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पालखेडच्या रोटेशन मिळण्यास विलंब झाल्यास शहरावर मोठे जलसंकट ओढावणार आहे. पालखेडचे रोटेशन लवकरात  लवकर सोडण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
जलकुंभाच्या पाइपमधून पाण्याची गळती
मनमाड शहरात पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. महिला वर्ग हंडाभर पाण्यासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते. इतकी भीषण परिस्थिती असताना वागदर्डी धरणालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात आलेल्या जलकुंभाच्या पाइपमधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून शहरातील जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यात येत असतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्राला खेटून असलेल्या व्हॉल्व्हमधून पण मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाणी वाया जाते. भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याच्या होणाºया अपव्ययाबाबत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Web Title:  Manakhadkar's 'wait' for the waterfall of Palkhed water!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.