उड्डाणपुलावरुन पिंपळगावमध्ये प्रवेशासाठी पर्यायी मार्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:49 IST2021-01-29T20:16:35+5:302021-01-30T00:49:34+5:30
पिंपळगाव बसवंत : उड्डाण पुलावरून पिंपळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या.

उड्डाणपुलावरुन पिंपळगावमध्ये प्रवेशासाठी पर्यायी मार्ग करा
गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळगाव बसवंत ते गोंदे महामार्गाचे काम सुरू आहे. त्यात पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील बाजार समिती ते पाचोरे वणी फाटापर्यंत उड्डाणपूल करण्यात आला आहे. हा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आल्याने पिंपळगाव बसवंत शहराजवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी ८ जानेवारीपासून दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. परंतु उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील बाजार समिती ते पाचोरे वणी फाटा या ६ किलोमीटर अंतरामध्ये पिंपळगाव बसवंत शहरात जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग काढण्यात आलेला नाही. पर्यायी मार्ग सर्व्हिस रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. ही बाब लक्षात घेत आमदार बनकर यांनी संबंधित नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी करीत प्रमिला लॉन्सजवळ उड्डाणपुलावरून पूर्व-पश्चिम बाजूने चढ उतरण्याकरीता पर्यायी मार्ग त्याचप्रमाणे शगुन लॉन्सजवळ पर्यायी मार्ग तसेच रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ बेहेड, नारायणटेंभी, कारसुळ आदी गावांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात यावा. पाराशरी नदीवर सर्व्हिस रोडसाठी नवीन पूल तयार करावा, चिंचखेड चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गार्डन व व्यावसायिकांसाठी शौचालय निर्मिती करावी, सर्व्हिस रोडलगतच्या गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे, सर्व्हिस रोड लगतचे स्ट्रीटलाईट बसविणे, सर्व्हिस रोड लगतची साफसफाई करणे, वणी चौफुली येथील सर्कल दुरुस्ती करून निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्या असे विविध प्रश्न लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी बनकर यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
याप्रसंगी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास मोरे, पिंपळगाव बसवंत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष बाळा बनकर आदीसह नॅशनल हायवे ॲथोरिटीचे अधिकारी दिलीप पाटील, पंकज मोहाबे, मुरली मोहन, सुरेश शिंदे, फैजान खान, विनोद बच्छाव, निखील गाडे, प्रवीण जावरे उपस्थित होते.